आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे.

आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे.

पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते दाखून देणार असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात शिवसेनेने मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्यासह संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘शिवसेना पक्ष किंवा संघटना नाही तर विचार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. निवडणूक जिंकणे किंवा हारणे महत्त्वाचे नाही.

कार्यकर्ते जिवंत ठेवले पाहिजेत. करोना काळात शिवसेनेने आदर्श काम केले आहे. परंतु आपण प्रसिद्धीपासून दूर राहिलो. शिवसेनेतून अनेक नेते दुसऱ्या पक्षांत गेले. प्रत्येक पक्षात हा नवा-जुना वाद असतो. प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा वाघ पाहिजे. पदे येतील व जातील परंतु सर्व सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे,’ असेही पाटील म्हणाले.

मंत्री गडाख म्हणाले, ‘पारनेर तालुक्यातील शिवसेना नव्या विचारांने व जोमाने पेटलेला आहे. पारनेर तालुक्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. जे अपयश आले आहे ते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धूवुन काढावे’, असे आवाहन मंत्री शंकराव गडाख यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe