Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसे नेते वसंत मोरे हे एका लग्नसोहळ्यानिमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली त्यावेळी अजित पवारांनी वसंत मोरेंना थेट पक्षप्रवेश करण्याची ऑफरचं दिली.
अजित पवार यांनी थेट तात्या कधी येताय, वाट पाहतोय असे विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांनी वसंत मोरे यांना जाहीरपणे विचारल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच वसंत मोरे यांना ऑफर दिल्याने मोरे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का? मोरे मनसेला जय महाराष्ट्र करणार का? असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत.
अजित पवार यांनी वसंत मोरे यांना लग्नसोहळ्यात असा प्रश्न केल्याने मोरे गरबडले आणि स्मितहास्य करून हा विषय टाळला. अजित पवार यांच्या ऑफेरमुळे आता मनसेला आणखी खिंडार पडणार का?
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी पक्षातील कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच वसंत मोरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे निलश माझिरे मनसेला सोडचिट्ठी दिल्याने मोरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.