अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
त्यानुसार सुरुवातीस सुमारे ६०० ठिकाणी वाइन विक्रीला उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. राज्यात सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने घेतला होता.

मात्र महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध केला होता.
त्यानंतर भाजपने राज्यभरात या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून सामाजिक क्षेत्रातूनही या निर्णयास विरोध होत आहे.दरम्यान भाजपच्या विरोधाला न जुमानता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार इतिवृत्त मंजूर करण्यात आले.
त्यामुळे सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. जाणून घ्या सरकारची नियमावली राज्यात ज्या वायनरी वाइन तयार त्यांना थेट सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये स्वत: खरेदी करण्याची सुविधा असलेले शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.
किमान १०० चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या नोंदणीकृत असलेलेच सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्येही केवळ वाइन विक्रीस परवानगी मिळणार आहे.
मात्र शैक्षणिक व धार्मिक स्थळांजवळ असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करता येणार नाही. या दुकानांना वाइन विक्रीचा परवाना घ्यावा लागणार असून त्यासाठी वार्षिक पाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
फक्त सुपर मार्केटमध्येच वाइन उपलब्ध होईल. किराणा दुकानांमध्येही वाइनची विक्री होणार, असा अपप्रचार काही जणांनी सुरू केल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही किराणा दुकानांमधून वाइनची विक्री होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम