कोपरगाव- येथील खडकी परिसरात मंतरलेले तेल पिल्याने मृत्यू झालेल्या वनिता हरकळ प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर आनाप यांनी काल मंगळवारी कोपरगावला जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेवून चौकशी केली आहे.
याबाबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी वनिता हरकळ उपचारासाठी गेलेल्या डॉ. फुलसौंदर यांची भेट घेतली. तेव्हा सदर महिलेला न्यूमोनिया आणि कावीळची लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठीचे औषधे देखील त्यांनी दिलेली होती. पेशंट पुन्हा उपचारासाठी आले नाही, त्यांचा मृत्यू झाल्याचे पेपरमध्ये वाचले, असे डॉ. फुलसौंदर यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे कोणत्याही आजारासाठी बुवा, भोंदू बाबांकडे न जाता वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनिता हरकळ यांच्या कोपरगाव शहरातील खडकी येथे असलेल्या घरी भेट दिली. अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचे बंधू संजय पंढरे, मयत महिलेची मुलगी शिवानी यांची भेट झाली. बहिणीने फादरकडे घेतलेल्या उपचाराबद्दल त्यांनी पश्चाताप केला. त्यामुळे कुणीही कोणत्याही आजारासाठी भोंदू बाबा, बुवाकडे जाऊ नये व आपल्या आयुष्य धोक्यात घालू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची भेट घेऊन या प्रकाराबद्दल माहिती घेतली. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास चालू आहे आणि योग्य पुरावे हाती लागल्यानंतर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, किशोर पवार यांच्याकडे तपासाची सूत्रे असून आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. सदर महिलेच्या मृत्यूनंतर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करणे आवश्यक होते.
पुढील तपास व कारवाईसाठी ते अधिक उपयुक्त ठरले असते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक तपास चालू असून प्रबळ पुरावे हाती आल्यानंतर कठोर कारवाईचे शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात लक्ष घातल्याबद्दल पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, डॉ. फुलसौंदर व मयत महिलेच्या कुटुंबीयांनी आभार मानले.
फादरला तातडीने अटक करावी, महाराष्ट्र अंनिसची मागणी
कावीळ सारख्या गंभीर आजारी व्यक्तीला औषधोपचारापासून रोखून तंत्रमंत्राद्वारे चुकीचा उपचार केल्याने फादर गौडा याला जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत तातडीने अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगरचे अध्यक्ष अरुण कडू पाटील, कार्याध्यक्ष मधुकर अनाप, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रा. प्रवीण देशमुख, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, अशोक कदम, विनोद वायंगणकर, फारुख गवंडी, प्रकाश घादगिणे, मुंजाजी कांबळे, मुक्ता दाभोलकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.