Ahmednagar News : आगामी वर्षभराचा काळ निवडणुकांचा असणार आहे, त्यामुळे या निवडणुकात कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांविषयी मनामध्ये मान, सन्मानाचा राग, लोभ न ठेवता बाजार समितीची निवडणूक जिंकून बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार राज्याला दाखवून द्यायचा आहे,
अशी खूणगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या कामाला कार्यकत्यांनी लागावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठोबा राजे मंगल कार्यालयात पार पाडला.
या वेळी आमदार राजळे बोलत होत्या. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राहुल राजळे, अर्जुन शिरसाट, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, उद्धव वाघ, अशोक चोरमले, नंदकुमार शेळके, रक्ताटे, नारायण धस, बाळासाहेब अकोलकर, संजय बडे, अमोल गर्जे, भिमराव फुंदे, भगवान आव्हाड,
अरुण मिसाळ, विजय मिसाळ आदी उपस्थित होते. या वेळी राजळे म्हणाल्या, आमदारकीप्रमाणे ही बाजार समितीची छोटी निवडणूक असणार आहे. गावागावांत जाऊन नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्या मतदारांशी संवाद साधून एक एक मत आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावे.
प्रत्येक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी पार पाडल्यास निवडणूक जिंकण्यासाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत आपण साथ द्याबी, अशी साद शेवटी आ. राजळे यांनी मेळावादरम्यान शेतकरी व मतदारांना घातली आहे. स्वागत बाळासाहेब अकोलकार यांनी केले. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी आभार मानले.