चिंताजनक ! आता दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीब होणार, कोणी केलाय गरिबीचा अजब दावा? वाचा

Ahilyanagarlive24 office
Published:

जगाला कोरोना (Corona) सारख्या आजाराने मोठ्या संकटात टाकले आहे. या संकटामुळे देशात आर्थिक संकट (Economic crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अभूतपूर्व महागाई (Inflation) आणि बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचा सामना करताना लाखोंच्या वाटय़ाला गरिबी येणार आहे.

त्यामुळे जगामध्ये दर ३३ तासांत १० लाख लोक गरीब (Poor) होणार आहेत असा दावा स्वित्झर्लंडच्या (Switzerland) दावोसमध्ये भरलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये (World Economic Forum) करण्यात आला आहे. यावर्षी 26.30 कोटी लोक गरीब होतील असा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोना काळानंतर दोन वर्षांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची वार्षिक बैठक दावोस येथे होत आहे. त्यात जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोक सहभागी झाले आहेत.

या बैठकीमध्ये ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ (Oxfam International) या संस्थेने वाढत्या गरीबीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ हा अहवाल सादर केला आहे. कोरोना काळात श्रीमंतांची संख्या वाढत होती परंतु आता गरिबीचा आलेख उंचावत चालला आहे असा धक्कादायक दावा त्यात करण्यात आला आहे.

गरजेच्या आणि अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीने गेल्या अनेक दशकांमधील विक्रम मोडले आहेत. या दरवाढीचा वेगही त्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे असे या अहवालात नमूद आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये वेगाने भर पडत आहे.

खाद्यान्न आणि ऊर्जा क्षेत्रातील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये दर दोन दिवसांनी एक अब्ज डॉलर्सची भर पडत आहे. पण दुसरीकडे त्याच वेगाने गरीबीचा आलेखही वाढत चालला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन पावले उचलण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe