Maharashtra Rain Update : पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे. तसेच पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन ते उत्तर-पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असल्याने एकूणच पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. परंतु येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट ), तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत साधारण पावसाचा (यलो अलर्ट ) इशारा भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रदीप राजमाने यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात २४ तासांत कोयना परिसरात सर्वाधिक पाऊस
राज्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस हा कोयना परिसरात पडला आहे. कोयना परिसरात १६३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्या खालोखाल दावडी ९१ मिमी, लवासा ६६.५ मिमी, डुंगरवाडी ६५ मिमी, भोर ६१.५ मिमी, ताम्हिणी घाट परिसरात ६० मिमी, खंडाळा ५७ मिमी, अंबोने ५६ मिमी, भिरा ५१ मिमी, शिरगाव ४५ मिमी, लोणावळा ४१ मिमी, खोपोली ३५ मिमी, भिवपुरी २० मिमी, निमगिरी १९ मिमी, तर गिरीवन येथे १५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.