Marathi news : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांच्या एका टीमला कधी काळी समुद्रामध्ये बुडालेल्या एका प्राचीन मंदिराचा शोध लागला असून, या प्राचीन मंदिरामध्ये अब्जावधी डॉलर्सचा खजिना आढळून आला आहे. ‘युरोपियन इन्स्टिट्यूट फॉर अंटरवॉटर आर्केयोलॉजी’ प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
इजिप्तमध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर कधी काळी हे मंदिर नैसर्गिक आपत्तीमुळे बुडाले होते. फ्रेंच पुरातत्त्व संशोधक फ्रँक गोडिओ यांच्या नेतृत्वाखालील पुरातत्त्व संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. थॉनिस हेराक्लिओन नावाच्या शहरामध्ये हे मंदिर होते. अमून नावाच्या देवाचे हे मंदिर होते, असे सांगण्यात येते.
इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मध्यात एका नैसर्गिक आपत्तीमध्ये या मंदिराची पडझड झाली होती. मंदिराचे अवशेष समुद्रात बुडाले होते. त्या काळात इजिप्तमधील राजे महाराजे या मंदिरात शक्ती प्राप्त करण्यासाठी येत असत.
शक्ती प्राप्त करण्यासाठी हे राजे महाराजे देवासमोर सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्ने ठेवत असत. हाच खजिना पुरातत्त्व संशोधकांना आता सापडला आहे. सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्नांसोबत या मंदिरात पुजेचे साहित्य आणि काही सुगंधी द्रव्येही सापडली आहेत.
या संशोधनातून असेही स्पष्ट झाले आहे की, या प्राचीन मंदिराचे बांधकाम दगड आणि लाकूड यांच्या साह्याने करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने या प्राचीन मंदिराबद्दलची माहिती मिळवणे संशोधकांना शक्य झाले आहे. अमून नावाच्या या देवतेच्या मंदिराच्या पूर्वेकडे एका प्राचीन ग्रीक मंदिराचे अवशेषही सापडले आहेत.