Google Search Tips:- आजकालचे युग इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या कालावधीत गुगल सारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर तुम्हाला कुठलीही माहिती उपलब्ध होते. गुगल हे व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भागच बनला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्हाला हवी असेल व तुम्ही ती गुगलला जाऊन जर सर्च केली तर क्षणात तुम्हाला ती उपलब्ध होते.
याशिवाय अनेक प्रकारचे व्हिडिओ तसेच फोटो व लेख इत्यादी देखील आपल्याला गुगलवर वाचायला किंवा पाहायला मिळतात. परंतु तुम्ही जर खूप जास्त प्रमाणामध्ये गुगलचा वापर करत असाल तर त्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे किंवा सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे.
कारण गुगलवर काही गोष्टी शोधणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरू शकते व त्यामुळे तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते. म्हणजेच अशा पद्धतीच्या काही गोष्टींचा गुगलवर शोध घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे व त्याबद्दल मात्र अनेक व्यक्तींना अजूनपर्यंत माहितीच नाही. त्यामुळे गुगलवर नेमके काय सर्च करू नये? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.
गुगलवर या गोष्टींचा शोध घेऊ नका
1- तुम्ही कधीही चुकून देखील गुगलवर चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित काहीही शोधू नये. ही बाब कायदेशीरदृष्ट्या तर गुन्हा आहेच परंतु नैतिकदृष्ट्या देखील हे चुकीचे आहे. जर कोणताही वापरकर्ता अशा पद्धतीचा सर्च किंवा शोध घेताना दिसून आला तर त्याच्यावर पॉकसो आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो आणि त्याला तुरुंगात जावे लागू शकते.
2- दुसरे म्हणजे गुगलवर बरेच लोक सर्च करतात आणि भरपूर प्रमाणात पीडीएफ, गाणी तसेच एखादा सिनेमा डाऊनलोड करतात. परंतु अशा पद्धतीने डाऊनलोड करत असताना आपल्याला माहीत नसते की, चित्रपट, गाणी किंवा सॉफ्टवेअरच्या पायरेटेड आवृत्या डाऊनलोड केल्या तर कॉपीराईटची समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रकारे गुगलवर अशा काही गोष्टींचा शोध घेणे किंवा ते डाऊनलोड केल्याने देखील तुम्हाला दंड भरावा लागू शकतो व इतकेच नाहीतर तुरुंगात देखील जावे लागू शकते.
3- समजा गुगलवर सर्च करताना जर तुम्ही बॉम्ब बनवण्यासारख्या गुन्हेगारी प्रक्रियांची माहिती घेतली किंवा शोध घेतला तरी देखील तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे धोकादायक मानले जात असून अशा परिस्थितीत अशा पद्धतीच्या गोष्टींचा सर्च किंवा शोध घेतल्यास देखील तुरुंगात जावे लागू शकते.
4- बऱ्याचदा अनेकांना गुगलवर काही औषधांची नावे शोधण्याची सवय असते. परंतु अशाप्रकारे औषधांची नावे शोधताना देखील काळजी घ्यावी लागेल. तुम्ही गुगलवर औषधे किंवा देशात बंदी घातलेल्या औषधांच्या खरेदीशी संबंधित माहिती कधीही शोधू नये. असे करणे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. ज्या माध्यमातून तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते आणि दंडही भरावा लागू शकतो.
5- तसेच डार्क वेबशी संबंधित गोष्टी शोधणे व त्यामध्ये प्रवेश करणे इत्यादी देखील फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याच्या कक्षेत येते. त्यामुळे अशा प्रकारची गोष्ट करणे देखील टाळावे.