Dental Health Tips : पांढरेशुभ्र दात आपल्या सौंदर्याला वाढवण्याचे काम करतात. दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी आपण सर्व उपाय करतो – डॉक्टरपासून घरगुती उपायांपर्यंत. परंतु, नेमके जे करायला पाहिजे तेच करत नाही. दातांचा पिवळसरपणा अनेक कारणांमुळे असू शकतो.
जसं की – व्यवस्थित ब्रश न केल्यामुळे, औषधांची प्रतिक्रिया होणं, हार्मोन्समध्ये बदल होणे, धूम्रपान करणे, तोंडाची अस्वच्छता, आनुवंशिक कारणं किंवा आपला आहार. दात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात.

दातांना चमकदार बनवण्यासाठी बऱ्याच वेळा दंतचिकित्सकाची मदत घ्यावी लागते, परंतु असे करणे खूप खर्चिक आहे. यासाठी काही उपाय सांगत आहोत – आपल्या आहारात काही फळांचा समावेश करून आपण सुंदर आणि चकचकीत दात मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया…
संत्रे
संत्रे आरोग्यासाठी चांगले आहे. हे व्हिटॅमिन C चे चांगले स्रोत आहे. निरोगी हिरड्या आणि दातांसाठी संत्र्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन C व्यतिरिक्त कॅल्शियम देखील आढळते, जे दात आणि हाडांसाठी फायदेशीर असू शकते.
सफरचंद
सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. शरीराला आरोग्याशी निगडित समस्यांपासून वाचवण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. सफरचंद हे दातांना आणि हिरड्यांना बळकट करते. यासाठी सफरचंदाचे सेवन आवर्जून करावे.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी एक अतिशय चविष्ट फळ आहे. हे फळ चवीलाच चांगले नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये मॉलिक अॅसिड असते, जे दातांचे डाग काढण्यास उपयुक्त आहे. स्ट्रॉबेरीमध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून लावल्यानं दातांना चकचकीत बनवू शकतो.
केळी
केळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. केळीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. एवढेच नव्हे तर केळी खाल्ल्याने दातात अडकलेले अन्नाचे कण देखील निघून जातात आणि केळी दातांना चकचकीत बनवण्यासाठी मदत करते.
किवी
किवीचे सेवन केल्याने दात बळकट आणि चकचकीत बनतात. किवीमध्ये व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि फॉलिक अॅसिड आढळते, जे दातांसाठी चांगले असते.