सावधान ! कागदपत्रे तुमची… सिमकार्ड वापरतोय दुसराच

Ahmednagarlive24 office
Published:
Mobile SIM card

मोबाईलचे सिमकार्ड घेण्यासाठी विक्रेत्यांकडे आपली कागदपत्रे देताय तर सावधान! अनोळखी सिमकार्ड विक्रेत्यांकडून या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात २०२१ मध्ये अशी अनेक बनावट कार्ड विक्री झाली आहेत.

मोबाईल कंपन्यांनी पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर सायबर दहशतवादविरोधी पथकाने खात्री करून संशयितांची धरपकड सुरू केली आहे. तीन महिन्यांत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय दूरसंचार विभाग, भारत सरकार यांच्याकडून २०२१ मध्ये कोल्हापुरात विविध ठिकाणी मोबाईल सिमकार्ड विक्री करणाऱ्या मोबाईल कंपन्यांच्या सबडिलर्सनी बनावट कागदपत्रांचा वापर करून सिमकार्ड वितरित केली आहेत.

ही माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली आहे. त्यानुसार अधीक्षक पंडित यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. भुजबळ यांच्या सूचनेनुसार दहशतवादविरोधी शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, अशोक पाटील, प्रकाश नरके, अमर वासुदेव, सागर माळवे, अजय सावंत यांच्या पथकाने तपास करून पेठवडगाव येथील तुषार माने याला अटक केली.

त्याने गुन्हा कबूल केला आहे. करवीर पोलीस ठाण्यातही अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. अडीच ते तीन महिन्यांत दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.केवळ पैसे मिळवण्यासाठी कार्ड विक्रेत्यांनी ग्राहकांच्या कागदपत्रांचा वापर करून फॉर्मवर स्वतःचा फोटो जोडून नामवंत कंपन्यांची सीमकार्ड वितरित केल्याचे लक्षात आले आहे.

आपल्या कागदपत्रांवर कोणीतरी तिन्हाईत व्यक्ती सिमकार्ड वापर असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मोबाईल कंपन्यांनी माहिती दिल्यानंतरच फसवणुकीचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

बेकायदेशिररीत्या नियमबाह्य सिमकार्ड विक्री करणाऱ्या वितरकावर पोलिसाचे कटाक्षाने लक्ष आहे. असे कृत्य केलेल्या वितरकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भविष्यात ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे वितरकांनी कागदपत्रांचा गैरवापर करणे टाळावे. -महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

गैरवापराची शक्यता

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या सिमकार्डचा वापर दहशतवादी, गुन्हेगार, खंडणी बहाद्दर यांच्याकडून होऊ शकतो. गुन्हेगार गुन्हा करतील आणि ज्याच्या कागदपत्रांचा यासाठी वापर झाला, ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार आहेत. पुण्यात पकडलेल्या दोघा दहशतवाद्यांनी अशा सिमकार्डचा वापर केल्याचे समजते.

सतर्कता बाळगा

सिमकार्ड ओळखीच्या वितरकाकडून घ्या. कार्ड घेण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग होत नसल्याची खात्री करा. ऑनलाईन कागदपत्रे पाठवताना दक्षता घ्या. झेरॉक्स काढताना संबंधित व्यक्ती आपले दस्त कॉपी करत नाही, हे कटाक्षाने पाहावे, कोणी बेकायदेशीरपणे सिमकार्ड विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवा

झेरॉक्स दुकानांना पत्रे

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच झेरॉक्स सेंटरचालकांना पोलिसांनी पत्रे पाठवून ग्राहकांची झेरॉक्ससाठी आलेली महत्वाची कागदपत्रे इतरांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्या. डबल झेरॉक्स कॉपी करणे असे प्रकार करू नयेत. कोणाकडून असे गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यास संबंधिताला सहआरोपी केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe