अपस्मार, म्हणजेच एपिलेप्सी, हा एक मेंदूशी संबंधित विकार असून जगभरात सुमारे ५.२ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. ‘द नोट पब्लिका हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हा जगातील चौथा सर्वाधिक सामान्य मज्जासंस्था विकार आहे.
या आजारात मेंदूतील पेशींची क्रिया असामान्य होते, ज्यामुळे रुग्णाला वारंवार झटके येतात. हे झटके किरकोळ असू शकतात, पण कधी कधी हे तीव्र स्वरूपाचे आणि धोकादायक देखील ठरू शकतात.

कोणाला होऊ शकतो हा आजार
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अपस्मार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो – लहान मूल असो वा वृद्ध. या आजारामुळे शरीरावरचा ताबा गमावतो आणि अचानक झटके येतात. योग्य उपचार घेतल्यास या विकारावर नियंत्रण मिळवता येते. मात्र वेळेवर निदान होणे खूप आवश्यक आहे.
मृत्यू दरात घट
१९९० ते २०२१ या कालावधीत अपस्माराच्या रुग्णसंख्येत १०.८% वाढ झाली असली, तरी या दरम्यान मृत्यू दरात १४.५% घट झाली आहे. हे यश लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे मिळाले असल्याचे संशोधकांचे मत आहे. यापूर्वी या आजाराविषयी समाजात भीती आणि गैरसमज होते. पण आता लोकांच्या विचारसरणीत बदल झाला असून अधिक प्रकरणे समोर येत आहेत.
२० जुलै २०२३ रोजी WHO ने “इंटरसेक्टोरल ग्लोबल अॅक्शन प्लॅन ऑन एपिलेप्सी अॅण्ड अधर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स” जाहीर केला. योजनेचा उद्देश म्हणजे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून अपस्मार व इतर न्यूरोलॉजिकल विकारांवरील उपचार व काळजी अधिक सुलभ व सर्वत्र उपलब्ध करणे.
गरीब देशांमध्ये जास्त परिणाम
२०२१ मध्ये गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये श्रीमंत देशांच्या तुलनेत ३ ते ४ पट अधिक प्रकरणे आणि मृत्यू आढळले. याचे मुख्य कारण म्हणजे आरोग्यसेवा सुविधांची कमतरता आणि उपचारांची अनुपलब्धता. या देशांमध्ये नवीन प्रकरणांची वाढ ८२.१%, तर मृत्यूची वाढ ८४.७% नोंदवली गेली.
अनेक प्रकरणांमध्ये अपस्माराचे कारण अज्ञात अथवा आनुवंशिक असते, तर काही केसेस मेंदूतील इजा, संसर्ग, ट्युमर किंवा जन्मजात दोषांमुळे होतात. हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक असल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
हवामान बदलांचा मानसिक आरोग्यावर परिणाम
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (UCL) संशोधनानुसार, हवामानातील तीव्र बदल व आपत्तीजन्य घटनांचा मानसिक विकारांनी त्रस्त लोकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी विशेष आरोग्य सेवा धोरणांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजही अपस्माराविषयी समाजात माहिती आणि समज यांचा अभाव आहे. जागरूकतेच्या माध्यमातून या आजाराचे वेळीच निदान करणे, योग्य उपचार देणे आणि रुग्णांना सामाजिक स्वीकार मिळवून देणे – हेच या विकारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रभावी उपाय आहेत.