Health Tips : आपण सर्वजण रात्री शांत झोप घेतो. झोप ही मानवी शरीराची एक अत्यावश्यक गरज आहे. दिवसभर केलेले काम आणि त्या कामाचा थकवा झोपेमुळे नाहीसा होतो आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अगदीच उत्साहवर्धक होते.
समजा आपल्याला काही कारणास्तव एखाद्या रात्री झोपता आले नाही तर आपल्याला थकवा, चिडचिड आणि तणाव जाणवतो. तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतलेलाच असेल.

झोपेमुळे शरीर आणि मनाला विश्रांती मिळते, तर झोपेचा अभाव मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो ? हो, माणूस विना झोपता किती दिवस जगू शकतो ? असा विचार तुम्ही केला आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भात वैज्ञानिक संशोधनातून काय समोर आले आहे, याची माहिती पाहणार आहोत.
झोपेविना माणुस किती दिवस जगतो?
वैज्ञानिक संशोधनांनुसार याचे नेमके उत्तर अजून मिळालेले नाही. तथापि, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नुसार, 1997 पर्यंत सर्वात जास्त वेळ जागे राहण्याचा विक्रम रॉबर्ट मॅकडोनाल्ड यांच्या नावावर होता.
त्यांनी तब्बल 18 दिवस, 21 तास आणि 40 मिनिटे झोप न घेता जागे राहण्याचा पराक्रम केला होता. मात्र, या प्रयोगानंतर त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम झाले आणि त्यामुळे 1997 मध्ये हा विक्रम नोंदवण्याची श्रेणीच बंद करण्यात आली.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या आरोग्य विभागानुसार, झोपेचा अभाव ही एक गंभीर स्थिती आहे जी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे विचार करण्याची क्षमता कमी होते, मूड बदलतात, ऊर्जा कमी होते आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.
दीर्घकाळ झोपेचा अभाव राहिल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन वाढ, हृदयरोग आणि मानसिक अस्थिरता यांचा धोका वाढतो. सतत 24 तासांपेक्षा जास्त वेळ जागे राहिल्यास लक्ष केंद्रित करणे कठीण होते, प्रतिक्रिया मंदावतात आणि शरीरात असंतुलन जाणवते.
त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ पुरेशी आणि नियमित झोप घेण्याचा सल्ला देतात. पुरेशी झोप मिळवण्यासाठी दररोज ठराविक वेळी झोपणे, झोपण्यापूर्वी मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहणे, हलका व्यायाम आणि कॅफिन तसेच अल्कोहोलचे सेवन टाळणे उपयोगी ठरते. पुरेशी झोप ही केवळ विश्रांती नव्हे, तर दीर्घकालीन आरोग्याची हमी आहे.













