Health Tips:- आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणे खूप कठीण होत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणावामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे. तज्ज्ञांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून आपण दीर्घायुष्य मिळवू शकतो आणि अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.
आयुर्वेदिक सल्लागार डॉ. रिनी वोहरा श्रीवास्तव यांच्या मते, प्रदूषण आणि असंतुलित जीवनशैलीमुळे आजच्या तरुण पिढीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. त्यामुळे त्यांना विविध आजार जडत आहेत. परंतु योग्य सवयी अंगीकारल्यास आरोग्य सुधारता येऊ शकते.

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक सवयी
संतुलित आहार
सर्वप्रथम संतुलित आहार हा आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्त्व मिळवण्यासाठी आहारात ताज्या फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि नट्स यांचा समावेश करावा. आपल्या आहारात गोड, आंबट, तुरट, कडू, तिखट आणि खारट असे सहा प्रकारचे रस असणे आवश्यक आहे.
ऋतूनुसार फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. याशिवाय आले, लसूण, हळद आणि जिरे यांसारखे पूरक पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने पचनसंस्था सुधारते आणि शरीर फ्लूपासून सुरक्षित राहते.
पुरेशी झोप घेणे
आरोग्य सुधारण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. झोप अपुरी झाल्यास शरीर थकलेले राहते आणि अनेक आजार निर्माण होतात. आयुर्वेदानुसार, झोप ही नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत आहे
आणि ती शरीराच्या पुनर्बांधणीस मदत करते. एका प्रौढ व्यक्तीसाठी दररोज किमान ७-८ तासांची गाढ झोप घेणे गरजेचे आहे. जर झोप चांगली मिळाली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारते.
व्यायाम
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. रोज 30 मिनिटे चालणे, धावणे किंवा कोणताही व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि वजन नियंत्रित राहते. योग आणि प्राणायामामुळे रक्ताभिसरण सुधारते.
तणाव कमी होतो आणि शरीर अधिक लवचिक होते. विशेषतः ध्यान आणि श्वसनाच्या तंत्रामुळे मनःशांती मिळते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवल्यास व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी उपयुक्त असते.
पुरेसे पाणी पिणे
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे देखील आवश्यक आहे. दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचा, केस आणि पचनसंस्था निरोगी राहते. जर शरीर निर्जलीत झाले तर थकवा, डोकेदुखी आणि चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे नारळपाणी, लिंबूपाणी आणि ताज्या फळांच्या रसांचा समावेश आहारात करावा.
तणावापासून दूर राहणे
शेवटी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तणाव व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. सततचा तणाव रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. नियमित ध्यान, संगीत ऐकणे, छंद जोपासणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे तणाव दूर होतो. मन शांत असेल तर शरीर देखील निरोगी राहते.
निरोगी आणि दीर्घायुषी राहण्यासाठी या पाच महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि तणाव नियंत्रण या सर्व गोष्टी केवळ तुमचे आरोग्य सुधारतीलच पण तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी ठेवतील. या साध्या सवयी अंगीकारल्यास आजारांपासून मुक्त राहता येईल आणि जीवनशैली अधिक आरोग्यदायी बनवता येईल.