Maharashtra Tourism : कोकण म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गणपतीपुळे, अलिबाग किंवा हरिहरेश्वर अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळं उभी राहतात. मात्र कोकणाची ओळख केवळ या मोजक्या ठिकाणांपुरती मर्यादित नाही. तब्बल ७२० किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर आजही अशी अनेक ठिकाणं आहेत, जी निसर्गाच्या कुशीत शांतपणे दडलेली आहेत.
गोंगाट, गर्दी आणि व्यावसायिक पर्यटनापासून दूर राहून जर तुम्हाला स्वच्छ, निवांत आणि नितळ समुद्रकिनारा अनुभवायचा असेल, तर ही ठिकाणं नक्कीच भेट देण्यासारखी आहेत.

भोगवे समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्रकिनारा हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम इथे पाहायला मिळतो. पांढरीशुभ्र वाळू, निळेशार पाणी आणि सभोवतालची हिरवळ यामुळे हा किनारा अत्यंत रमणीय दिसतो. जवळच्या टेकडीवरून बॅकवॉटर आणि समुद्राचा संगम पाहण्याचा अनुभव खास ठरतो.
निवती समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग
डोंगराआड लपलेला निवती समुद्रकिनारा अजूनही फारसा परिचित नाही. त्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ कमी असते. समुद्राच्या लाटांनी घडवलेले नैसर्गिक खडक आणि स्वच्छ परिसर यामुळे हा किनारा परदेशी बीचसारखा भासतो. जवळच असलेल्या निवती किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते.
गणेशगुळे समुद्रकिनारा, रत्नागिरी
रत्नागिरी शहराजवळ असूनही गणेशगुळे समुद्रकिनारा अजूनही शांत आहे. दोन डोंगरांच्या कुशीत वसलेला हा किनारा मनाला शांतता देणारा आहे. किनाऱ्यालगत असलेली नारळ-पोफळीची दाट बाग या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालते.
आडे-उत्तमंबर समुद्रकिनारा, रत्नागिरी
दापोलीजवळील आडे-उत्तमंबर समुद्रकिनारा निसर्गाची एक सुंदर कलाकृती मानला जातो. टेकडीवरील भार्गवराम मंदिरातून दिसणारा अथांग समुद्र मनाला वेगळीच शांती देतो. हा भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पर्यटनापासून दूर आहे.
कोंडिवली समुद्रकिनारा, रायगड
श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरजवळ असूनही कोंडिवली समुद्रकिनारा दुर्लक्षित राहिला आहे. लांब पसरलेला हा किनारा शांत पाण्यासाठी ओळखला जातो. एकांतात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा सोलो ट्रॅव्हलसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे.
या ‘हिडन जेम्स’ समुद्रकिनाऱ्यांना भेट देताना कोकणाचा खरा, शांत आणि निसर्गरम्य चेहरा अनुभवता येतो.











