Marriage Rituals : हिंदू सनातन धर्मात लग्नाला एक महत्वाचा संस्कार म्हणून ओळखलं जात. हिंदू धर्मात लग्न हा दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना जोडणारा सोहळा समजला जातो. हा एक कायदेशीर आणि सामाजिक सोहळा आहे. हिंदू धर्मातील विवाह सोहळ्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक विधी केले जातात.
लग्नामुळे दोन व्यक्तींमध्ये पती-पत्नीचे नाते तयार होते. लग्न सोहळा फक्त दोन व्यक्तींना जोडत नाही तर दोन वेगवगळी कुटुंबे एकमेकांशी जोडतो. लग्नात विविध परंपरा आणि विधींचा समावेश होत असतो.

लग्न सोहळ्यात कन्यादान, सप्तपदी, मंगलाष्टके इत्यादी गोष्टी केल्या जातात. यात वरमाल्याची सुद्धा विधी असते. लग्नातील वरमाला सोहळा हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. या सोहळ्यात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार ज्याला वरमाला असे म्हटले जाते ते घालतात.
वरमाला नवरा नवरी दोघेही एकमेकांच्या गळ्यात घालतात. पण हा विधी बहुधा वधूकडून सुरू होत असतो. म्हणजे वधू आधी वराच्या गळ्यात हार टाकते. पण आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वरमाला विधी कधी सुरु झाली ? आणि हा विधी का केला जातो ? दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
वरमाला पद्धत कधी आणि का सुरु झाली ?
खरे तर लग्न सोहळ्यात होणारा वरमाला विधीचा संबंध थेट रामायणाशी जोडण्यात आला आहे. असे सांगितले जाते की प्राचीन भारतात “स्वयंवर” ही परंपरा प्रचलित होती, ज्यामध्ये राजकन्या आपल्या पसंतीच्या मुलाला हार घालून त्याला जीवनसाथी म्हणून स्वीकारत असे.
रामायणात सुद्धा असाच स्वयंवर झाला होता. सीता-राम यांचा स्वयंवर सोहळा हा रामायणातील एक महत्त्वाचा भाग. हा सोहळा जनकपुरीत झाला. माता सीतेने जो कोणी स्वयंवरातील शिवधनुष्य उचलेल त्याला आपण आपला जीवनसाथी म्हणून निवडणार असा प्रण घेतला होता.
दरम्यान, ह्या स्वयंवरात भगवान श्रीरामांनी शिवधनुष्य तोडले आणि त्या क्षणी माता सीतेने त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना पती म्हणून स्वीकारले. दरम्यान याच घटनेपासून हिंदू सनातन धर्मात वरमाला ही पद्धत रूढ झाली.
याच स्वयंवरापासून हिंदू लग्न सोहळ्यात वधूकडून वराला प्रथम हार घालण्याची परंपरा प्रस्थापित झाली. या गोष्टीला फक्त धार्मिक अँगल आहे असे नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते.
सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, वरमाला हा स्वीकृती, सन्मान आणि समानतेचा प्रतीक आहे. या विधीचा सामाजिक दृष्टिकोनातून असा अर्थ असतो की वधू वराला जीवनसाथी म्हणून स्वीकारते, तर वरही वधूचा सन्मान राखण्याचे वचन देतो.
वरमाला विधी दोघांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाचा शुभारंभ दर्शवते. लग्न छोटे असो किंवा मोठे असो तिथे सप्तपदी आणि वरमाला या विधी फारच महत्त्वाच्या मानल्या जातात.
थोडक्यात वरमाला केवळ फुलांची देवाणघेवाण नाही, तर ती बंधन, विश्वास आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. वधूचा हार टाकणे म्हणजे प्रेम, समर्पण आणि जीवनातील सर्व सुख-दुःखात जोडीदारासोबत राहण्याची प्रतिज्ञा घेणे असाच आहे.













