Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी मानले जातात. विद्वान महात्मा चाणक्य यांची नीतिमत्ता आजही प्रचलित आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार आचरण केल्याने मानवी जीवनाला योग्य दिशा मिळते.
स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकात काही ना काही गुण असतात, काही शक्ती असते, ज्याच्या साहाय्याने ते आपलं काम पूर्ण करतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीत राजे, ब्राह्मण आणि स्त्री यांची सर्वात मोठी शक्ती कोणती? याबाबत सांगितले आहे. चाणक्य म्हणतात की, प्राचीन काळापासून राजे, ब्राह्मण आणि स्त्रिया यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे.
*स्त्रियांची शक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचा मधुर वाणी, सौंदर्य, गुण आणि तारुण्य. स्त्रियांच्या शक्तीची चर्चा केल्यानंतर आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की, स्त्रीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तिचे गोड बोलणे अर्थात मधुर वाणी.
आपल्या सुरेल आवाजाने कोणालाही आकर्षित करण्याची ताकद महिलांमध्ये असते. कोणत्याही स्त्रीचे शारीरिक सौंदर्य ही तिची दुसरी सर्वात मोठी शक्ती असते. मात्र आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही स्त्रीचा आवाज तिच्या शारीरिक सौंदर्यापेक्षा महत्त्वाचा असतो. कारण गोड आवाज अर्थात मधुरवाणी असलेली स्त्री कमी सुंदर असूनही कुणावरही नियंत्रण ठेवू शकते.
*राजाची शक्ती म्हणजे स्वतःचे बाहुबल
आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही राजाची शक्ती ही त्याची स्वतःची पॉवर अर्थात बाहुबल असते. राजाकडे त्याचे सैन्य व मंत्री असले तरी तो सामर्थ्यवान असणेही महत्त्वाचे आहे. राजा स्वत: शक्तीहीन असेल तर तो कोणावरही राज्य करू शकत नाही.
*ब्राह्मणाची शक्ती ज्ञान
ब्राह्मणाची शक्ती हे त्याचे ज्ञान आहे. तो जितका ज्ञानी असेल तितका त्याला सन्मान मिळेल. ईश्वर आणि जीवनाशी संबंधित ज्ञान ही कोणत्याही ब्राह्मणाची सर्वात मोठी शक्ती आहे.