Marathi News : पावसाअभावी यंदा बाजरीचे क्षेत्र घटल्याने बाजरीला भाव चढणार असून हिवाळ्यात गरम बाजरीची खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. थोड्याच दिवसात हिवाळा सुरु होणार आहे.
त्यावेळी अनेक ठिकाणी आहारात बाजरीचा समावेश केला जातो. बाजरी खाल्ल्याने आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहते व अनेक आजार होण्याचा धोकाही टळतो. बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे गहू व तांदळापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे.
थंडीच्या दिवसात लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही खास पदार्थ खातात. निरोगी राहण्यासाठी शरीराला अशा पौष्टिक आहाराची गरज आहे. अलिकडे ग्रामीण भागात गहू खाण्याचे प्रमाण वाढत आहे.
परिणामी ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. थंडीच्या दिवसात बाजरी खाण्याचे अधिक फायदे आहेत. सर्व तृणधान्यात जास्तीत जास्त उर्जा देणाऱ्या बाजरीचा वापर आहारात केला जातो.
अधिक उर्जा देत असल्याने शारीरीक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी अधिक फायदेशीर आहे. यंदाच्या हंगामात पावसाने उशीरा हजेरी लावल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यात बाजरीचा पेरा अत्यल्प असल्याने यंदा हिवाळ्यात बाजरीची भाकरी महगणार आहे.