Railway News : रेल्वे प्रवास हा एक किफायतशीर आणि सोयीस्कर वाहतूक मार्ग आहे. दररोज लाखो लोक याचा लाभ घेत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि विनाअडथळा व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने रेल्वे कायदा १९८९ अंतर्गत काही नियम आणि कायदे केले आहेत.
या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. येथे आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत.
प्रतिबंधित सामान
सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांना काही धोकादायक साहित्य आणि सामान गाडीत नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल सारख्या ज्वलनशील वस्तू, तसेच स्फोटके, फटाके आणि बंदुका यांना सक्त मनाई आहे. रेल्वेचे डबे आणि स्थानकांमध्ये धूम्रपान आणि कोणतेही ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यास मनाई आहे.
लगेजची देखील मर्यादा
प्रवाशांना विशिष्ट मर्यादेपर्यंत काही प्रमाणात सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. तथापि, विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. गैरसोय आणि अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
पाळीव प्राणी
पाळीव प्राणी हे अनेकांचे आवडते साथीदार असले तरी रेल्वेत सर्व प्रकारच्या प्राण्यांना परवानगी नसते. एसी स्लीपर कोच, एसी चेअर कार कोच, स्लीपर क्लास किंवा सेकंड क्लास कोचमध्ये कुत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जात नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावून गाडीतून बाहेर काढले जाईल.
नियम उल्लंघनाचे परिणाम
रेल्वे कायदा 1989 च्या कलम 164 नुसार ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ बाळगणे दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 165 नुसार दोषींना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.