Proposal Of TRAI:- भारतातील लँडलाइन टेलिफोन नंबर लवकरच १० अंकी होण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने आपल्या नवीन नंबरिंग योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. या प्रस्तावानुसार लँडलाइन सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि क्रमांक व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन १०-अंकी प्रणाली लागू केली जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांत मोबाईल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विकासामुळे लँडलाइन फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर घटला आहे. तरीही काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये – जसे की व्यावसायिक सेवा, सरकारी कार्यालये आणि काही तांत्रिक प्रणालीत लँडलाइन क्रमांकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परिणामी ट्रायने नवीन नंबरिंग प्रणालीचा प्रस्ताव मांडला आहे ज्यामुळे भविष्यातील दूरसंचार गरजा पूर्ण करता येतील.
कसा असेल नवीन नियम?
ट्रायच्या प्रस्तावानुसार, लँडलाइन ते लँडलाइन कॉलसाठी ‘०’ डायल करून त्यानंतर संबंधित क्षेत्राचा एसटीडी कोड आणि ग्राहकाचा क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. हे बदल क्रमांकांचे वाटप अधिक सुटसुटीत करण्यासाठी करण्यात येत आहेत. हा नियम लागू करण्यासाठी दूरसंचार विभागाला (DoT) सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
तथापि, मोबाईलवरून लँडलाइनवर किंवा मोबाईल ते मोबाईल कॉलिंगच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच ग्राहकांसाठी या संदर्भात कोणतीही अतिरिक्त अडचण उद्भवणार नाही.
लँडलाइन नंबर पोर्टेबिलिटी आणि कॉलर आयडीसाठी नवीन नियम
ट्रायने लँडलाइन क्रमांक पोर्टेबिलिटी (MNP) ची संकल्पनाही पुढे आणली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचा लँडलाइन क्रमांक न बदलता सेवा प्रदाता बदलण्याचा पर्याय मिळेल. जसे मोबाईल पोर्टेबिलिटीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय कॉलर आयडी फीचर तात्काळ लागू करण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामुळे स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येईल.
स्पॅम कॉल आणि मेसेजेसवर कडक उपाययोजना
ट्रायने अलीकडेच दूरसंचार कंपन्यांसाठी काही कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. स्पॅम कॉल आणि अनावश्यक मेसेजेस रोखण्यासाठी कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास भाग पाडले जात आहे. स्पॅम कॉलिंग रोखण्यात अपयशी ठरलेल्या काही प्रमुख दूरसंचार कंपन्यांना ट्रायने मोठा दंडही ठोठावला आहे.
ग्राहकांसाठी नवीन टॅरिफ प्लान्स
गेल्या वर्षाच्या अखेरीस ट्रायने नियम बदलून दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र टॅरिफ प्लॅन देणे बंधनकारक केले. या नियमानुसार सेवा प्रदात्यांनी किमान एक असा टॅरिफ प्लान ऑफर करावा ज्याची वैधता ३६५ दिवसांपेक्षा जास्त नसेल. याचा मोठा फायदा अशा ग्राहकांना होणार आहे.जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवांचा उपयोग करतात. पण डेटा वापरत नाहीत.
तसेच ट्रायने कंपन्यांना किमान १० च्या रिचार्ज कूपनसह विविध किंमतीचे टॉप-अप प्लान्स देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक लवचिक पर्याय मिळतील आणि त्यांची गरजेनुसार रिचार्ज करणे सोपे होईल.
दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल
दूरसंचार विभाग आणि ट्रायच्या या नव्या नियमांमुळे भारतातील टेलिकॉम इकोसिस्टम अधिक सुटसुटीत आणि प्रभावी होणार आहे. १०-अंकी लँडलाइन नंबर, पोर्टेबिलिटी, कॉलर आयडी लागू करणे आणि स्पॅम कॉल्सवर नियंत्रण ठेवणे यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना अधिक सुविधा आणि सुरक्षितता मिळेल. तसेच दूरसंचार कंपन्यांना अधिक जबाबदारीची जाणीव राहील.