अहिल्यानगर : पूर्वी रोजच्या वापरातील बहुतांशी वस्तू या मातीपासून तयार केलेल्या असत मात्र कालांतराने बदल होत गेले अन मातीच्या भांड्याऐवजी पितळी, तांबे, लोखंड, स्टिल व आता तर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू दैनंदिन वापरात आहेत. मात्र या वस्तू मानवाच्या आरोग्यासाठी किती चांगल्या आहेत. याबाबत फारसे कोणी पाहत नाही मात्र असे प्लॅस्टिकच्या वस्तू वापरने घातक असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.
सध्या विविध रसायने वापरून भांड्याना आकर्षक लुक दिला जातो . त्याचसोबत काळ्या रंगाच्या प्लास्टिकपासून बनलेले स्वयंपाकघरातील चमचे, पळी, सोलाने, खाद्यपदार्थ ठेवण्याचे खोके आदी वस्तू त्यातील अग्निरोधक विषारी रासायनिक घटकांमुळे आरोग्यासाठी धोकादायक आहेत, त्यातील रासायनिक घटक अन्नात मिसळू शकतात, आणि हीच घातक रसायने अन्नावाटे थेट शरीरात जाऊ शकतात असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केमोस्फिअर नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या २०३ काळ्या प्लास्टिकच्या घरगुती उत्पादनांचे विश्लेषण केले गेले. त्यात स्वयंपाकघरातील भांडी, खोके आणि खेळणी यांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये डेकाब्रोमोडायफेनिल इथर (बीडीई-२०९) नावाचे अग्निरोधक रसायन सापडले. विशेष म्हणजे ते मानवी आरोग्याला धोकादायक म्हणून एक दशकाहून अधिक काळापूर्वी अमेरिकेत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते.
संगणक, टीव्ही आणि उपकरणांतील (ई-कचरा) प्लास्टिकचा फेरवापर करून बनवले जाते. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सामान्यतः अग्निरोधक ब्रोमिन, अँटीमनी आणि शिसे, कॅडमियम, पारा यासारखे जड धातू असतात. हे पदार्थ आणि जड धातू मानवासाठी विषारी असल्याने आता अनेक देशांमध्ये त्यावर बंदी आहे. असे असले तरी यापैकी काही रसायने असलेले प्लास्टिक अजूनही आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते.
‘स्वयंपाकघरातील अशा काही भांड्यांमुळे दररोज ३४,७०० नॅनोग्रॅम प्रतिदिन रसायने शरीरात जाण्याची शक्यता आहे. परंतु स्वयंपाकघरातील फेरवापर न होणाऱ्या सर्व काळ्या प्लास्टिकच्या वस्तू फेकून देणे हा समस्येवरील उपाय नाही. या वस्तूंचा थेट अन्नपदार्थांशी संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला या बाबत अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून दिला आहे.
मात्र तरी देखील काहीतरी नवीन करण्याच्या नादात आपले आरोग्य धोक्यात टाकण्यापेक्षा असे प्लास्टिकच्या वस्तूचा वापर न करणे कधीही चांगलेच राहील. त्यामुळे स्वयंपाकघरात प्लास्टिकच्या वस्तू कशा कमीतकमी वापर करता येतील याबाबत काळजी घेतलेली चांगली .