Maharashtra News : नाशिक जिल्ह्यात पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमधील जलसाठा ५५ हजार ०२२ दशलक्ष घनफूट म्हणजे ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात सध्या १० धरणांचा जलसाठा १०० टक्के झाला असून, १० धरणांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे. गिरणा, तिसगाव धरणात निम्मा जलसाठा झाला आहे. नागासाक्या मात्र कोरडेच आहे. माणिकपुंजची स्थिती काहीशी तशीच आहे. नाशिक, नांदगाव, मनमाडसह अनेक भागांत पाऊस झाला. जवळपास १४ धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही धरणे जवळपास तुडुंब झाली आहेत.
या व्यतिरिक्त पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे पूर्ण भरली आहेत. मनमाड शहराला आवर्तनाद्वारे पाणीपुरवठा करणारे पालखेड धरण पूर्णपणे भरल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे करंजवण धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून, पालखेड धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे.
गिरणा, तिसगावमध्ये निम्माच जलसाठा
मुकणे धरण ९० टक्के भरले आहे. काही दिवस संततधार सुरू राहिल्यास ते तुडुंब भरू शकते. तिसगावमध्ये ५३, तर गिरणा धरणात केवळ ५४ टक्के जलसाठा आहे. नागासाक्या धरणात यंदा एक टक्काही जलसाठा झाला नाही.
माणिकपुंज धरणात केवळ नऊ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांची एकूण ६५ हजार २३० दशलक्ष घनफूट क्षमता आहे. सध्या त्यात ५४ हजार ७९१ (८३ टक्के) जलसाठा आहे.