MSRTC News : दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड तर ४ बसेस जाळल्या एसटीला ४ कोटींचा फटका

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारपासून पुन्हा हिंसक वळण लागले आहे. एकट्या बीडमध्ये ७० बसेसची तोडफोड जमावाकडून करण्यात आली असून

राज्यभरात गेल्या दोन दिवसांत १०० बसेसची तोडफोड करण्यात आली आहे, तर ४ बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे.

यामध्ये गेल्या दोन दिवसांत एसटी महामंडळाचे तब्बल ४ कोटींचे नुकसान झाले असून अनेक आगार बंद असल्याने प्रतिदिन २ कोटींचे नुकसान होत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली ” सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. गावखेड्यांतील सर्वसामान्य मराठा बांधव रस्त्यावर येत असून काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशा घटनांत एसटी महामंडळाचेही नुकसान झाले आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांत १०० एसटी बसेसची तोडफोड, तर ४ बसेसची जाळपोळ झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

राज्यभरातील ५० आगार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. मराठवाड्यात हा परिणाम दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला मुंबई, नागपूर, कोकण, पुणे, अमरावती या विभागांमधील एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाच्या संमतीनेच एसटीची सेवा सुरू करावी; अन्यथा परिस्थिती सामान्य होईपर्यंत एसटीचे आगार बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, उपरोक्त विभागातील वाहतूक पूर्णतः अथवा अंशत: बंद असल्याने दररोज एसटीचा २-२.५ कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.

बीडमध्ये सोमवारी बस स्थानकामध्ये जमावाने घुसखोरी करत बस स्टँडमध्ये उभ्या ७० पेक्षा जास्त एसटी बसेसची तोडफोड केली आहे. यासोबत बीड आगारातील कंट्रोल ऑफिसची तोडफोड करत घोषणाबाजी केली.

मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील हे शांततेने आंदोलन हाताळण्याचे आवाहन करत आहेत आणि समाजही शांत आहे. मात्र एसटीचे हे नुकसान करणारे बेकायदेशीर वाहतूक करणारे आहेत की काय, अशी शंका येते.

पण माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की, ही लालपरी आपल्या सर्वांच्या मालकीची आहे. सुख-दुःखात हीच कामाला येते. कोरोना काळातसुद्धा केवळ एसटीच धावत होती. आपल्या लेकरांना शाळेलासुद्धा आपली एसटीच धावून येते. तेव्हा या लालपरीवर दगड मारू नका, तिचं रक्षण करा.–संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe