लष्करात भरती करण्याच्या आमिषाने दोन कोटींना गंडा, 42 मुलांची फसवणूक

Published on -

Maharashtra News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने ४२ तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या मुलांना तब्बल एक कोटी ८० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पांडुरंग कराळे (रा. तासगाव, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. महेश पंढरीनाथ ढाके (वय ३५, रा. पाटण, सातारा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ढाके हे शेतकरी असून ते कामानिमित्त पुण्यात आले होते. काम आटपून पुन्हा सातार्‍याकडे निघताना कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये ते नाश्ता करण्यासाठी थांबले. तेथे आरोपी कराळे एकाबरोबर गप्पा मारत होता.

ढाके यांनी लष्कर भरतीबाबतच्या गप्पा ऐकल्याने कराळेशी ओळख केली. लष्करातील मोठ्या अधिकार्‍यांशी माझी ओळख असून तुमचे नातेवाईक किंवा मित्र असतील तर माझ्याशी संपर्क साधायला सांगा, लष्करात नोकरी मिळवून देतो अस खोटे आमिष कराळे याने दिले.

ढाके यांनी विश्वास ठेवत मित्र नातेवाईक आदींकडून एक कोटी ८० लाख रुपये कराळेला आणून दिले. त्यानंतर कराळेने ढाके यांनी आणलेल्या २० तरुणांना वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने बेळगाव येथे नेले. त्यांना लेखी परीक्षेबाबतचे बनावट प्रवेशपत्र दिले. तरुणांकडून शैक्षणिक कागदपत्रे घेतली.

पैसे घेतल्यानंतर कराळेने संपर्क कमी केला. ढाके यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. फसवणूक करणार्‍यांमध्ये अहमदनगरमधील देखील काही लोकांचा समावेश असू शकतो असा अंदाज आहे. अधिक तपास दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स व पुणे पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News