Maharashtra News : फार्मसी प्रथम वर्षाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेत जय श्रीराम व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिणारे चार विद्यार्थी ५६ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील वीर बहादुर सिंह पूर्वांचल विद्यापीठात गतवर्षी हा अजब प्रकार घडला. माजी विद्यार्थ्यांमुळे उघड झालेल्या याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणाऱ्या दोन शिक्षकांना विद्यापीठ प्रशासनाने दोषी ठरवत निलंबित केले आहे.
विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) अर्ज केल्यामुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा समितीची बैठक झाली.
या बैठकीत ४ विद्यार्थ्यांना पास केल्याप्रकरणी डॉ. आशुतोष गुप्ता व डॉ. विनय वर्मा या दोन शिक्षकांना दोषी ठरवण्यात आले. पूर्वांचल विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या डी. फार्मा. अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सेमीस्टरचे काही विद्यार्थी चुकीची उत्तरे देऊनही उत्तीर्ण झाल्याचे समजल्यानंतर आरटीआय अंतर्गत माहिती मागवल्याचे माजी विद्यार्थी दिव्यांशु सिंह यांनी सांगितले.
काही विद्याथ्यांचे परीक्षा क्रमांक देत उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी दिव्यांशूने केली होती. तपासणी दरम्यान चार वेगवेगळ्या बारकोडच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ व विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या या क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिल्याचे निदर्शनास आले.
उत्तरपत्रिकेत भलतेच काहीतरी लिहिणाऱ्या या विद्यार्थ्यांना ७५ पैकी ४२ गुण देऊन उत्तीर्ण केले होते. या विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले गुण ५६ टक्के होत असल्याचे माजी विद्याथ्यनि म्हटले आहे. याप्रकरणी माजी विद्यार्थ्याने राज्यपालांना पत्र लिहिले होते.
त्यात एक प्राध्यापक पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याचा आरोप केला होता. राज्यपाल कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत २१ डिसेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते.
यानंतर विद्यापीठाने चौकशी समितीची स्थापना करत बाहेरच्या दोन परीक्षकांकडून या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या. यावेळी चार विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. यानंतर संबंधित प्रकरणी विद्यापीठाच्या दोन शिक्षकांना दोषी ठर्वले असून त्यांना निलंबित केले आहे.