Railway Good News : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची वाढती प्रवासी संख्या पाहता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गणपती उत्सवासाठी २०८ विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. या सेवांबरोबरच यात आणखी ४० विशेष रेल्वे गाड्यांची वाढ केल्याचे सांगण्यात आले.
यामध्ये ट्रेन क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी स्पेशल एक्स्प्रेसच्या ३० सेवा सोडल्या आहेत. आठवड्यातून ६ दिवस या सेवा धावणार आहेत. १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई सेंट्रल येथून आणि १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत सावंतवाडी येथून अशा एकूण ३० सेवा धावणार आहेत.
![Railway News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Railway-Good-News.jpg)
१५ अप आणि १५ डाऊन सेवा असणार आहेत. या गाड्या मध्य रेल्वेच्या वसई-पनवेल-रोहा मार्गावरून जाणार असून पनवेल आणि रोहा येथे थांबणार आहेत. तसेच ट्रेन क्रमांक ०९०१८/०९०१७ उधणा ते मडगाव स्पेशल एक्स्प्रेसच्या ६ सेवा आठवड्यातून एकदा धावणार आहेत.
दर शुक्रवारी उधणा येथून १५, २२, २९ सप्टेंबर रोजी, तर मडगाव येथून दर शनिवारी १६, २३, ३० सप्टेंबर रोजी अशा ६ सेवा धावणार आहेत. अप मार्गावर ३ आणि डाऊन मार्गावर ३ सेवा चालणार आहेत. मध्य रेल्वेच्या वसई-पनवेल-रोहा मार्गावरून या गाड्या जाणार असून पनवेल आणि रोहा येथे थांबणार आहेत.
यासोबत ट्रेन क्रमांक ०९१५०/ ०९१४९ विश्वामित्री-कुडाळ स्पेशल एक्सप्रेसच्या ४ सेवा धावणार आहेत. ही सेवा आठवड्यातून एकदा धावणार असून विश्वामित्रीपासून दर सोमवारी १८, २५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथून, तर दर मंगळवारी १९, २६ सप्टेंबर रोजी अशा एकूण चार सेवा धावणार आहेत.
२ अप आणि २ डाऊन सेवा धावणार असून मध्य रेल्वेच्या वसई-पनवेल-रोहा मार्गावरून या गाड्या जाणार आहेत. या गाड्यांना पनवेल आणि रोहा येथे थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत आणखी गणपती विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे मध्य, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.