अहिल्यानगर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगर दक्षिण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगर दक्षिणेतील सर्वच तालुक्यांतील रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने दक्षिण जिल्ह्यात सुमारे ९०० रक्त पिशव्यांचे संकलन झाल्याची माहिती भाजपाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त नगर दक्षिण जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याबरोबरच मंडलस्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव पणा न करता, कुठलीही बॅनरबाजी करून गाव, शहराचे विद्रुपीकरण न करता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. राज्यभरात या एकाच दिवशी भाजपच्या सर्व मंडळांत रक्तदान शिबीर घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक कार्य, संवेदनशील नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी असलेली बांधिलकी ओळखून त्यांचा वाढदिवस समाजहितासाठी साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवावर्गाने समाजोपयोगी कार्यात पुढे यावे, असा संदेशही या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला.
अहिल्यानगर तालुका, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर तालुक्यात तसेच तालुक्यातील मंडलस्तरावर रक्तदान शिबीर पार पडले. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा स्थानिक आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. ‘ रक्तदान म्हणजेच सर्वश्रेष्ट दान’ आहे. आपल्या रक्ताने एखाद्याला जीवनदान मिळेल हा विचार करत दक्षिण जिल्ह्यातून सुमारे ९०० रक्त पिशव्यांचे संकलन झाले आहे.