Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे धनगर समाज आरक्षण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. येत्या दोन दिवसात याबाबत काय निर्णय घेता येईल, यावर मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी येथे दिली.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे मागील ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यातील एक उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली व यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Dhangar-photo-ghya.jpg)
मंत्री महाजन म्हणाले, उपोषणकत्यांची प्रकृती ठीक असून अकरा दिवस उपोषण केल्याने त्यांच्या वजनात मोठी घट झाली आहे. मात्र त्यांचे वैद्यकीय अहवाल ठीक आले आहेत. त्यांना उपोषण सोडावे ही विनंती केली तसेच चोंडी येथे उपोषण कत्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हा मुद्दा आपण पुढे नेला आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आता तांत्रिक अडचणी दूर होत आल्या आहेत.लवकरच मंत्री मंडळाची बैठक घेत बावर चर्चा केली जाईल.
चर्चेतून मार्ग निघत असतो म्हणून आम्ही फडणवीस तसेच शिंदे व पवार यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच मी याठिकाणी येणार होतो. मात्र जालन्यातील उपोषणामुळे मला येण्यास विलंब झाला, मात्र येत्वा दोन दिवसात मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर काय तो निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकृती खालावत आहे
राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला असून, चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरुणांनी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यातच या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
या उपोषणकर्त्याची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. मात्र, या आरक्षणाकडे सरकारचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकत्यांकडून होत आहे. अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावत आहे.
पालकमंत्र्यांचे माहीत नाही
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप देखील चौडी येथे जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली नसल्याबाबत मंत्री महाजन यांना विचारण्यात आले असता, विखे आले कि नाही हे मला माहित नाही. मात्र मला वाटलं कि त्यांनी भेट घेतली असेल, असे महाजन म्हणाले व यावर अधिक भाष्य टाळले.