अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरातील शिवसेना पक्षातील गटबाजी संपावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली होती.
या बैठकीला शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर देखील उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी केलेल्या विधानाला आज महापौरांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर धादांत खोटे बोलत आहेत. त्यावेळी असा कोणताही विषय झाला नाही, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी म्हटले आहे.
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत तुमच्या उमेदवाराला भाजपची मते देऊ, असा प्रस्ताव महापौर वाकळे यांनी दिला होता, असा गौप्यस्फोट कोरगावकर यांनी केला होता. शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, नेते यांची गुरुवारी बैठक झाली.
या बैठकीत कोरगावकर यांनी वरील माहिती शिवसेनेच्या नगरसेवकांना दिली होती. महापौर वाकळे यांच्या प्रस्तावात धोका होता, त्यामुळे आपण त्यास नकार दिला, असे कोरगावकर यांनी सांगितले. स्थायी समिती सभापती मनोज कोतकर भाजपचेच आहेत,
असे एकीकडे सांगणारे वाकळे याच निवडणुकीत कोतकर विरोधात उमेदवार असलेल्या शिवसेनेचे योगीराज गाडे यांना भाजपची मते देण्याची तयारी दर्शवित असल्याचे कोरगावकर यांच्या विधानावरून समोर आले. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपलाही याची काहीच माहिती नव्हती. मात्र असे काही घडलेच नाही, असे महापौर वाकळे आणि त्यांच्यासोबत कोरगावकर यांची भेट घेण्यासाठी गेलेले उदय कराळे व संजय ढोणे यांनी सांगितले. शिवसेनेला भाजपची मते कसे देता येतील,
असा प्रश्न करून वाकळे म्हणाले, कोरगावकर यांच्याबरोबर भेट झाली मात्र अशी कोणतीही चर्चा त्यांच्यासमवेत झाली नाही. तसा विषयही नव्हता. त्यांनीच महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी देत जमा, असे सांगितले. त्यास आपण होकार दिला.
यापेक्षा वेगळी चर्चा तेथे घडलीच नाही. भाऊ कोरगावकर सारख्या ज्येष्ठ नेत्याने असे खोटे बोलू नये. कराळे, ढोणे यांनीही यास दुजोरा दिला. आम्ही स्वत: महापौर यांच्यासमवेत कोरगावकर यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र असा कोणताही विषय तेथे झाला नसल्याचे या दोघांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved