मुंबईत खासगी विमानास भीषण अपघात ! धावपट्टीवर उतरताना दुर्घटना झाल्याने आठ जण गंभीर जखमी

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी एक खासगी विमान धावपट्टीवर उतरताना जोरात आदळून घसरले. या भीषण अपघातात विमानाच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, सहा प्रवासी आणि दोन विमान कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमानात आगही लागली. मात्र ती तातडीने विझवण्यात आली.

या दुर्घटनेमुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमान वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. हवाई वाहतूक नियंत्रकांच्या (एटीसी) आदेशानुसार येणारी आणि जाणारी सर्व विमाने गोवा आणि अहमदाबादला वळवण्यात आली.

अपघातात विमानाचे कॅप्टन सुनील, कॅप्टन नील, जे. एम. बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कोटक, लार्स सोरेन्सन (डेन्मार्क), के. के. कृष्ण दास, आकर्ष सेठी, अरुल सॅली आणि कामाक्षी नामक एक महिला हे गंभीररीत्या जखमी झाले.

ते सर्व जण मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या लिमा जेट (लीआरजेट ४५) या खासगी विमानाने वैझागहून येत होते. हे विमान १५ आसनी आहे. मात्र त्यातून केवळ आठच जण प्रवास करत होते.

मुंबई आणि परिसरात गुरुवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, जोरदार वारेही वाहात आहेत. परिणामी दृश्यमानताही कमी झाली आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

असा झाला अपघात

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५.०२ वाजता ही दुर्घटना घडली. मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स लीअरजेट-४५ हे खासगी विमान वैझागहून मुंबईला सहा प्रवासी आणि दोन क्रू सदस्यांसह येत होते.

हे विमान धावपट्टी क्रमांक २७ वर उतरत होते. येथे उतरणारी विमाने जुहूच्या बाजूला जातात. मात्र उतरताना जोरदार वाऱ्यामुळे ते अचानक फिरून १८० कोनात मागे वळले आणि धावपट्टीवर आदळून समोरील भागाचा चक्काचूर झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe