३ जानेवारी २०२५ नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील खंडेरायाच्या यात्रेत पशू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात विविध पशुंमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातींचे श्वान पाहावयास मिळाले.
विविध श्वानाच्या जातींमध्ये राँट, ब्रिलर, लाँबराडॉग आदी जातींनी हजेरी लावली. यात्रेत एक कोटीचा घोडा दाखल झाला आहे. तसेच ६० हजारांचा श्वान विक्रीसाठी होता. छोट्या श्वानाचा ३० हजारांवर भाव होता. पॅरोटविक कोंबडा ९ हजार रुपये, ३ लाखांची देवणी जातीची गाय पाहावयास मिळाली.
घोडेबाजार हे माळेगाव यात्रेचे विशेष आकर्षण आहे. येथे विविध जातींचे अश्व दाखल झाले आहेत. यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, मारवाड, पंजाब, नुकरा, स्टॅलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातींचे अश्व दाखल आहेत.
यावेळी अश्वांच्या विविध कवायती प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या. माळेगाव यात्रेत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड आदी भागांतून घोडे व्यापारी येतात.
ब्लेझ खातोय भाव
परभणी जिल्ह्यातील इंद्रजीत रमेशराव वडपूरकर गेल्या ४५ वर्षांपासून माळेगावात येतात. त्यांची ही चौथी पिढी आहे. त्यांनी यात्रेत ब्लेझ नावाचा घोडा आणला होता. सारंगखेडा, पुणे अकलुज, बारामती व पोतूर येथे त्यांच्या अश्वाने बाजी मारली आहे. त्यांनी या अश्वाची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले.