Maharashtra News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व खासगी, शासकीय संस्था, आस्थापना, औद्योगिक, उद्योगधंद्यांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी आणि मतदारसंघातच मतदान प्रक्रिया होणार असेल, तर दोन तासांची सवलत दिली जावी, असे निर्देश आहेत.
परंतु, मागील काळात आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तीला मतदानापासून वंचित ठेवले जाईल किंवा सुट्टी दिली नाही, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

अपवादात्मक परिस्थिती म्हणजे रुग्णालये, वैद्यकीय संस्था आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नाही, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहे, त्यांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाईल,
याची खात्री करून कार्यवाही करावी, असेही राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. ४८ मतदारसंघांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त अनेकांनी स्थलांतर केले असले, तरी त्यांचे मतदान स्थानिक पातळीवर गावी, दुसऱ्या मतदारसंघात असते. त्यामुळे अनेक मतदारांना कामावरून सुट्टी दिली जात नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे कमी होणाऱ्या मतदानावरून दिसून आले आहे. जिल्हा प्रशासकीय पातळीवर काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेशउद्योग-ऊर्जा, कामगार व खनीकर्म विभागाने दिले आहेत.