मुंबई : मनसे (Mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क (Shivaji Park) दणाणून सोडला होता. या सभेत मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी त्यांनी केली होती. व मशिदीवरील भोंगे नाही हटवल्यास हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला होता.
या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी मनसेला घेरले आहे, तर मनसे मात्र या मुद्द्यावरून आक्रमक झालेली दिसत आहे. तसेच भाजपनेही (Bjp) मनसेला या मुद्द्यावर पाठिंबा दिल्याने मनसेला अधिक बळ मिळाले आहे.
त्यानंतर ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट डेडलाईनच (Deadline) दिली होती. ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे नाही हटवले तर मंदिरासमोर भोंगे वाजवू असा इशारा त्यांनी दिला होता.
यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता राज्याचे पर्यावरण मंत्री आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी काका राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, वाढत्या महागाईवर बोललं गेलं पाहिजे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या (CNG) बाबत बोललं पाहिजे. गेल्या ६० वर्षावर नव्हे तर दोन ते तीन वर्षावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी राज यांना नाव न घेता दिला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या अल्टिमेटमवर विचारण्यात आले असता त्यांनी हे उत्तर दिले आहे.
देशात महागाई वाढत आहे. लोक त्रस्त आहेत. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या दरावरही बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी काकांना दिलेला सल्ला ते मानतात का? किंवा त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.