Matheran Tourism : माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग हा साहसी खेळातील प्रकार विनापरवानगी सर्रास सुरू होता. या व्हॅली क्रॉसिंगमुळे येथील पर्यटनही वाढले होते. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता.
एको पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, मायरा पॉईंट, अलेक्झेंडर पॉईंट अशा विविध ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग सुरू होत्या. पण त्या वनविभागाच्या हद्दीत असल्याने वनविभागाने बंद केल्या. मात्र, आता येथील सनियंत्रण समितीच्या दोन सदस्यांनी जागेवर जाऊन भरपावसात पाहणी केल्यामुळे संबंधित विभागाची परवानगी घेऊन येथे व्हॅली क्रॉसिंग सुरू होण्याची आशा स्थानिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
माथेरानमधील विविध पॉईंटवर पुन्हा व्हॅली क्रॉसिंग सुरू व्हावी, अशी मागणी माथेरानमध्ये जोर धरत होती. याबाबत माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कारकीर्दीत ठरावही झाला होता. यासंबंधी एक प्रस्ताव तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आला होता.
त्यांनीही या प्रस्तावाला सकारात्मकता दाखवली होती. पण माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने व्हॅली क्रॉसिंगची परवानगी घेणे अडचणीचे होते. त्यातच सरकार बदलल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिला.
मात्र, आता चक्क सनियंत्रण समितीच्या दोन सदस्यांनी येथे पाहणी केल्यामुळे स्थानिक बेरोजगारामध्ये येथे व्हेली क्रासिंग सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शुक्रवार, १४ जुलै रोजी सनियंत्रण समितीचे सदस्य राकेश कुमार आणि डेव्हिड कार्डोस हे येथे पाहणीसाठी आले होते.
सायंकाळी साडेपाच वाजता अलेक्झेंडर पॉइंटवर जाऊन त्यांनी अलेक्झेंडर पॉइंट ते रामबाग पॉइंट व्हॅली क्रॉसिंगच्या जागेची पाहणी केली. मात्र, याबाबत ते प्रसारमाध्यमांशी काहीच बोलले नाहीत. या वेळी कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे,
तहसीलदार दिक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, सपोनि. शेखर लव्हे तसेच महसूल विभाग आणि पालिका विभागाचे कर्मचारी त्यांच्या सोबत होते. याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी सदस्यांनी केलेल्या पाहणीमुळे भविष्यात व्हॅली क्रॉसिंगचा साहसी प्रकार माथेरानमध्ये सुरू होईल,
अशा मानसिकतेमध्ये येथील स्थानिक बेरोजगार आहेत. व्हॅली क्रॉसिंग दोन वर्षे माथेरानमध्ये सुरू होती. दरम्यान, कोणताही अपघात झाला नाही. आम्ही याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे पूर्ण सुरक्षेचा विचार करून त्या सुरू ठेवल्या होत्या, पण त्यासाठी परवानग्या मिळत नसल्याने वनविभागाने व्हॅली क्रॉसिंग बंद केली. आता सनियंत्रण समिती सदस्यांना प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्याने व्हॅली क्रॉसिंग पुन्हा सुरू होईल, अशी आशा आहे.