२,१०० रुपयांचा निर्णय प्रस्तावानंतर

Published on -

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पात महिलांना २,१०० रुपये देऊ, अशी घोषणाच केली नव्हती, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिली. विरोधकांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला. मात्र, तटकरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे २,१०० रुपयांसाठी योग्य तो प्रस्ताव मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री उपस्थित असताना मंत्रिमंडळासमोर आमचा विभाग ठेवेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीकडून सुरुवातीपासून विरोध केला जात आहे. मात्र, याच योजनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा सरकार आल्यास महिलांना २,१०० रुपये देऊ, असे महायुतीने म्हटले होते. मात्र, निवडणूक पार पडल्यानंतर

महिलांच्या खात्यात २,१०० रुपये जमा झाले नाही. उलट निकषाचे कारण देऊन महिलांना योजनेतून कमी केले जात आहे. मात्र, काही महिला संजय गांधी निराधार आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. याचा अर्थ या महिलांकडून सरकारची फसवणूक केली आहे. अशा महिलांवर सरकार काय कारवाई करणार का? तसेच काही अधिकाऱ्यांमुळे महिलांना दोन्ही योजनांचा लाभ होत आहे. यामुळे सरकारच्या पैशांचा अपव्यय केला जात आहे. मग, अशा अधिकाऱ्यांवर सरकारकडून

कारवाई करणार का? असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. तर, निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. सरकारची तिरोजी ज्यांनी रिकामी केली, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. तसेच लाडक्या बहिणींकडून आता वसुली सुरू आहे. ही तरतूद मंत्र्यांच्या खात्यातून वसूल करणार का? अशा प्रश्नांचा भडीमार केला.

भाई जगताप, चित्रा वाघ यांनी लक्षवेधीवर मते मांडली. आतापर्यंत या योजनेतून २ कोटी ६३ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले. ऑगस्टपासून या योजनेसाठी तपासणीची प्रक्रिया सुरू झाली. संजय गांधी निराधार योजनेतील डेटा आम्हाला प्राप्त झाला, त्यात १ लाख ९७ हजार महिलांचा डेटा आला आहे. लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुरू असताना आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा डेटा प्राप्त होत गेला. सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले, तेव्हा २ लाख ५४ हजार संजय

गांधी निराधार योजनेचा डेटा प्राप्त झाला. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आचारसंहिता होती, म्हणून तपासणी प्रक्रिया बंद होती. तसेच डेटा परस्पर तपास करत नाहीत. इतर विभागाकडून आम्हाला डेटा येतो. त्यामुळे त्या-त्या पद्धतीने कारवाई आम्ही करत आहोत, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २,१०० रुपये देण्याची घोषणा करू, असे वक्तव्य केले नव्हते. योजना जाहीर झाली असली, तरी जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, असे त्या म्हणाल्या.

६५ वयानंतरच्या महिलांना लाभ नाही

लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत हप्ते काढले होते, त्यावेळी निकषात बदल केले नव्हते. मात्र, स्थानिक पातळीवर जशा तक्रारी प्राप्त झाल्या, तशी करवाई सुरू आहे; परंतु आरटीओवरून जो डेटा आम्हाला मिळाला, तशी कारवाई केली. जुलैमध्ये ५ लाख महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने सुरुवातीला प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर महिलांना खात्यात लाभदिला गेला. लाडकी बहीण योजना ही २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. त्यामुळे ६५ नंतरच्या महिलांना या योजनेतून बाद केले जाईल, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

तक्रार आली तरच कारवाई करू

लाडकी बहीण योजनेचा काही
महिलांनी गैरवापर केल्याची तक्रार मिळाल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी तक्रार केली, तर सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे. मात्र, महिलांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही, असे तटकरे म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News