महाराष्ट्रातील अनेक आमदार विविध चौकशीच्या फेऱ्यांत अडकले आहेत. अनेकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे तर अनेकांना अटकही करण्यात आली आहे. आता राजकीय वर्तुळातून एक मोठी येत आहे. आता आणखी एका आमदारावर ईडीने मोठे आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात न्यायालयातील विशेष PMLA कोर्टानं प्रोसेस जारी केली असून आता ईडीने आ. तनपुरे यांच्याविरोधात मनी लॉड्रिंगचा आरोप केला आहे.
13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झालं असल्याचा आरोप केला असून पदाचा दुरुपयोग करत दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप आहे.
दरम्यान आता या प्रकरणी प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख आदींसह प्रसाद शुगर अलाईड अग्रो प्रॉडस्टस ली. आणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा लि. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. यावर 12 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आ. प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे हे मनीलॉड्रिंग व कारखाना प्रकरण?
राम गणेश गडकरी साखर कारखान्यासाठी 26 कोटी 32 लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु आ. तनपुरे यांनी 13 कोटी 37 लाखांमध्ये हा कारखाना विकला. म्हणजेच आ. प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना हा कमी किंमतीत विकल्याचा आरोप त्यांच्यावर सध्या आहे. त्याचप्रमाणे कारखान्याची 110 एकर जागा त्यांनी गिळंकृत केली असल्याचा गंभीर आरोपही आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्जही थकीत असल्याचा आरोप होत आहे. अनेक अनावश्यक अर्थिक व्यवहार करून मनी लॉड्रिंग केल्याचा ईडीने आरोप केला असून ईडीच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे कोर्टाने मत नोंदवल्यानंतर आता आ. तनपुरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.