पावसाची अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आता अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने दे दणादण बॅटिंग केली आहे.
रविवारी (दि.१) दिवसभर नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींग केल्याने अनेक नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला असून लघु व मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. औंढा नागनाथ शहरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने कयाधू नदीला पूर आला आहे,
कयाधू कोपल्याने तिचे पाणी शहरात शिरले आहे. प्रसिद्ध औंढा नागनाथ मंदिराच्या मुख्य द्वारातून गुडध्याइतके पाणी वाहत होते, नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. परभणी जिल्ह्यातही दिवसभरात ७२ मि.मि. पावसाची नोंद झाली.
सायंकाळनंतर पावसाने उघडीप दिली तरीही त्याआधीच्या पूर, पाण्याने शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांत रविवारी दिवसभर पावसाने दमदार बॅटींग केली. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वेगाने वाढ होत असून अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरले आहेत.
हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. कयाधू, मधुमत्ती, पैनगंगा नद्यांना पूर आला आहे. शहरात जवळपास सात नगरांमध्ये तसेच अनेक वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
कयाधू नदीचे पाणी शहरात शिरल्याने अग्निशमन विभागाच्या पथकाने पुरात अडकलेल्या लोकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले. हिंगोलीत २००६ नंतर सर्वात मोठा पूर आल्याचे नागरिकांनी सांगितले.
जायकवाडी ८५ टक्के भरले
नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग झाला होता. त्यात आता मराठवाड्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय.
त्यामुळे आता हे धरण ८५ टक्के भरले आहे. यंदाच्या हंगामात १ जून ते ३१ ऑगस्टअखेर नाशिकमधून ३४ हजार सहा दशलक्ष घनफूट म्हणजेच ३४ टीएमसी आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट म्हणजेच २१.६ टीएमसी असा एकूण ५५.६ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून संघर्ष होत असून, गेल्या वर्षी नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र, आता नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने
मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग झाला असून, आता हे धरण ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे ऐन उन्हाळ्यात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही.