Maharashtra News : मुंबई, मराठवाडा आणि नगर जिल्ह्यांतील काही गावांची तहान भागवणारा नाशिक जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. असे असताना नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला यंदा नऊ टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबर रोजी केवळ ४७.१६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे पाणी सोडावे लागणार आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-10-19T103409.407.jpg)
यात नगरमधून चार, तर नाशिक जिल्ह्यातून पाच टीएमसी पाणी सोडावे लागेल, असा अंदाज आहे. जायकवाडीला पाणी देण्याविरोधात नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एकवटले असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे.
अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात विदर्भवगळता अन्यत्र पावसाची अवकृपा झाली. नाशिक जिल्ह्यात अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.
यंदा पर्जन्यमानतेत ४२ टक्के घट झाल्याने जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती असताना आता नाशिकमधून छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा विषय पुढे आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत केवळ पाण्याची आकडेवारी सादर करण्यात आली.
दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर होणाऱ्या बैठकीत नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणाचे किती पाणी वापरले गेले, याची माहिती जाहीर केली जाते. यंदा गोदावरी पाटबंधारे महामंडळाने ही माहितीही दिली नाही.
जायकवाडी धरणातून १ सप्टेंबरपासून १८० दशलक्ष घनफूट पाणी २५ दिवसांच्या आवर्तनाद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा आणखी घटला आहे. महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण कायदा २००५ मधील तरतुदीनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीचा साठा ६५ टक्के न झाल्यास नगर व नाशिकमधून पाणी सोडण्याची तरतूद आहे.
त्यामुळे यंदा नऊ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे, तर दुसरीकडे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आताच घाई करू नये, अशी मागणी नगर जिल्ह्यातून करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरचा उपयुक्त पाणीसाठा १०२३ दलघमी (४७.१४ टक्के), तर वरच्या धरणात २३६२ दलघमी (९५.३४ टक्के) इतका होता.
पाणीसाठा, वापराची आकडेवारी सादर झाल्यानंतर बाष्पीभवनाच्या आकडेवारीत काही त्रुटी आल्या आहेत. त्या दूर करून नऊ ते दहा टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे, असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा जलसंघर्ष पेटण्याची शक्यता आहे.