अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्रच्या राजकारणात लक्षात रहाव्या, अशा घटना अनेकदा घडल्या. पण 2 घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे वातावरणच पालटले. या दोन्ही घटना सत्ताबदल होतानाच्या घडल्या होत्या.
पहिलं म्हणजे पुलोद प्रयोग आणि दुसरा म्हणजे 2019 चा शपथविधी. सगळीकडे महाविकास आघाडीचे सरकार येणार, अशी चर्चा असताना एके दिवशी पहाटे अशी काही गम्मत घडली की, संपूर्ण राज्यात फक्त त्या दिवशी राजकारणाच्या चर्चा होत्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा होती, अजितदादांनी हे काय केलं. भाजपला मात्र मी पुन्हा येईन, वर विश्वास असल्याने ते आनंदात होते
पण करारी आणि बेदरकार असणाऱ्या अजितदादांचे फडणवीसांबरोबर कसे जमणार, हाही प्रश्न होताच. मात्र तरीही ते रडतखडत गुलाल उधळत होतेच. सोशल मीडियासह चावडीवरच्या राजकारणात ज्यांनी अजितदादांचा उदो उदो केला त्यांची तर दातखिळी बसली होती. अजितदादांनी हे का केले? कसे केले? याला कुणाचा पाठिंबा होता? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहेत. कधीमधी अजितदादांनी या प्रश्नांची उत्तरे देता देता जिभेवर कंट्रोल केला आहे.
मात्र तरीही एकदा खासदार व महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी एक भारी किस्सा सांगितला होता. 22 नोव्हेंबरची तारीख होती. सगळीकडे संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चालू असलेल्या सत्ता स्थापनेच्या चर्चा होत्या. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगे हे वाटा -घाटीचे काम पाहत होते. आपल्या काय मिळतेय, यापेक्षा राष्ट्रवादीला काही जास्त जाता काम नये, यावर त्यांचा फोकस जास्त होता.
संध्याकाळी मिटिंग लागली. काँग्रेसकडून हे दोघे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीकडून शरद-अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे मॅनेजमेंट गुरू प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली मात्र शरद पवार त्यासाठी तयार नव्हते. तिथे मात्र पवार आणि खरगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कायम संयमी भूमिका घेणारे पवार यावेळी पहिल्यांदाच संतापले.
राऊत यांनी हा किस्सा सांगताना असा उल्लेख केला आहे की, त्यांनी शरद पवारांना पहिल्यांदाच एवढं रागावलेल बघितलं. राऊत यांनी समझोता करायच्या आतच पवार मिटिंग सोडून निघाले. त्या पाठोपाठ पटेल आणि राऊत पण निघाले. मागेमागे चव्हाण-खरगेही गेले मात्र त्या दरम्यान ना अजितदादांनी काही भूमिका मांडली. ना अजितदादा काही बोलले. पूर्ण मिटिंगमध्ये घमासान सुरू असताना अजितदादा मात्र मान खाली घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते.
ते नेमकं कुणाशी आणि काय बोलत होते, हे मात्र माहिती नव्हतं. पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे होतील, हे सांगितले पण खरगे यांच्या भूमिकेने पवार संतापले आणि पूर्ण बैठक फिस्कटली होती. तरीही अजित पवार शांतपणे मोबाईल पाहत होते. त्या रात्री राऊत थोडे टेन्शनमध्ये होते. मात्र त्या रात्री अजित पवारांचा मोबाईल बंद असल्याची बातमी सगळीकडे पसरली. आता मात्र काहीतरी घोळ होणार, याचा अंदाज अनेकांना आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी राऊत उठले तेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले होते तर अजितदादा उपमुख्यमंत्री झालेले होते. मात्र तरीही संजय राऊत निवांत होते. त्यांनी शरद पवारांना एक फोन केला आणि मग ते अजूनच निवांत झाले. त्यापुढे काय घडले हे तर आपण सगळे जाणतोच.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम