लोकसभा निवडणुकीत आम्हाला निर्यातबंदीमुळे ठेच लागल्याची अजित पवार यांची कबुली !

Ahmednagarlive24 office
Published:
ajit pawar

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधक फेक नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काय खरे आणि काय खोटे, हे लोकांना कळून चुकले आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला निर्यातबंदीमुळे ठेच लागल्याची कबुली देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता कांद्यावर कुठल्याही प्रकारची निर्यातबंदी नसेल, असे सांगत, ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ या दोन्ही योजनांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने, तसेच विरोधकांकडून सुरू असलेला खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार दररोज दोन मतदारसंघांत आम्ही जाणार आहोत. नाशिक व उत्तर महाराष्ट्रात पाच दिवस हा दौरा असेल. त्याचबरोबर मुंबईत देखील दोन दिवस दौरा असणार आहे. महिला, बेरोजगारांना योजना समजावून सांगितल्या जात आहेत. शेतकऱ्यांना भेटून त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजना सांगणार आहोत.

मुलींना कॉलेजचे मोफत शिक्षण मिळणार आहे. आदिवासी आणि मागासवर्गीय घटकांना आधीपासूनच मोफत शिक्षण होते, असे पवार यांनी सांगितले.
नाशिक ही पावनभूमी आहे. जिथे श्रद्धा तिथे नतमस्तक व्हायचे असते.

सगळ्यांचा आदर करायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाताना भवानीमातेचे दर्शन घ्यायचे. तसे आम्हीही काळारामाचे दर्शन घेऊन, विरोधकांच्या विरोधातील लढाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

किकवी धरणाचे काम लवकरच…

नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या किकवी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. लवकरच धरणाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले. नाशिकचा शेतकरी कष्टकरी आहे, या भागात फळे, भाज्या, टोमॅटो, कांदा ही पिके घेतली जात असल्याने अधिकाधिक शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe