Potgi Kayda : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात पोटगीच्या दाव्यावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पतीची कोणतीही चूक किंवा ठोस कारण नसताना स्वतःहून वेगळे राहण्याचा निर्णय घेणारी आणि पतीने परत बोलावूनही नांदण्यास नकार देणारी पत्नी पोटगीसाठी पात्र ठरत नाही,
असा निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी दिला. या प्रकरणात पत्नीने पोटगी मिळावी म्हणून दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली. हा निर्णय वैवाहिक जबाबदाऱ्या आणि पोटगीच्या कायदेशीर अधिकारांबाबत एक दिशादर्शक ठरू शकतो.

या प्रकरणातील पती यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असून, पत्नी अकोल्याची आहे. दोघांचे लग्न २५ डिसेंबर २०१५ रोजी झाले होते. लग्नानंतर पत्नी फक्त दहा महिने पतीसोबत राहिली आणि नंतर माहेरी निघून गेली.
तिने पोटगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना पतीवर अनेक आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, लग्न ठरवताना पती महाविद्यालयात व्याख्याता असून त्याला भरपूर वेतन मिळते,
तो शिकवणी वर्ग चालवतो आणि त्याच्याकडे स्वतःचे घर व शेती आहे, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, या याचिकेत केलेले दावे खोटे असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले, ज्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
न्यायालयात समोर आलेल्या पुराव्यांनुसार, पती विनाअनुदानित महाविद्यालयात कार्यरत असून, त्याला केवळ ९ हजार रुपये मासिक वेतन मिळते. तो एका खोलीत राहतो आणि त्याच्याकडे दावा केल्याप्रमाणे संपत्ती किंवा शिकवणी वर्ग नाहीत.
पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींवर वाईट वागणुकीचे आरोप केले होते, परंतु ती एकही आरोप सिद्ध करू शकली नाही. उलट, पतीने पत्नीला परत येण्यासाठी समजावण्याचा खूप प्रयत्न केल्याचे रेकॉर्डवरून स्पष्ट झाले. पतीने पत्नीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले किंवा तिला नांदण्यास नकार दिला, याचे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयाला आढळले नाहीत.
न्यायमूर्तींनी या प्रकरणात पत्नीने स्वतःच्या मर्जीने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. पतीने तिला परत बोलावले असतानाही तिने नकार दिल्याने ती पोटगीच्या अधिकारापासून वंचित राहिली.
न्यायालयाने हे स्पष्ट केले की, पोटगीचा हक्क तेव्हाच कायम राहतो, जेव्हा पतीकडून देखभालीस नकार किंवा गंभीर चुका आढळतात. या प्रकरणात पतीची कोणतीही चूक नसल्याने आणि पत्नीने स्वतःहून नांदण्यास नकार दिल्याने तिची याचिका फेटाळण्यात आली.