Maharashtra News : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे, अशी मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची परंपरा कायम राखली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं आहे. आनंद दिघे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येत होते.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे. श्रावणातील चौथ्या सोमवारी अनेक भाविकांनी श्री भीमाशंकरचे मनोभावे दर्शन घेतले. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवलिंगाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, खा. श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजी आढळराव, आ. महेश लांडगे, शरद सोनवणे, जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोंडीलकर, चंद्रकांत कौदरे यांनी यात्रा काळात भाविकांची सोय केली.
१४८ कोटींचा विकास आराखडा तयार – मुख्यमंत्री
येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च करण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.