Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले.
यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले.

दोन्ही गटांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. ‘मुख्यमंत्री शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा होताच त्यास प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या समर्थकांनी ‘पन्नास ओके एकदम ओके’ अशा घोषणांनी प्रतिउत्तर देण्यात आले.
त्यामुळे वातावरण तंग बनु लागले. राहुरी पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खोक्याच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले. यावेळी काही जणांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.
खासदार लोखंडे हे राहुरी तालुक्यातील परंतु श्रीरामपूर मतदारसंघात असणाऱ्या ३२ गावांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिंदे गटाची कार्यकारणी नुकतीच जाहीर केली होती.
कार्यकारणीतील सदस्य अण्णासाहेब म्हसे, बापूसाहेब शिर्के, सुनील कराळे, राजेंद्र देवकर, संपत जाधव, श्याम गोसावी, बाळासाहेब पवार यांनी ‘एकनाथ शिंदे आगे बढो’च्या घोषणा दिल्या.
त्यानंतर ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यात आल्याने शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राहुल सिताराम चोथे, सुभाष मघाजी चोथे, सचिन भाऊसाहेब करपे, हमीद राजमहंमद पटेल, विठ्ठल सोन्याबापु सूर्यवंशी, चंद्रकांत शरद सगळगिळे, सुनील रावसाहेब कवाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.