RBI News : टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टोमॅटो महागल्याने त्याचा फटका इतर जीवनावश्यक वस्तू, तसेच अन्नधान्यांना देखील बसत आहे.
परिणामी महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही राज्यांमध्ये टोमॅटो २५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. पावसामुळे टोमॅटोच्या पिकांना मोठा फटका बसत असल्याने सर्वत्र टोमॅटो महागल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने सर्वसामान्यांना यातून दिलासा देण्यासाठी ८० रुपये किलोने टोमॅटो विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

टोमॅटोच्या किमती आता खाली येण्यास सुरुवात झाली असून किलोला १२० रुपये भाव मिळत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. टोमॅटोच्या वाढत्या दराची आरबीआयने देखील दखल घेतली असून जुलै महिन्यात प्रकाशित झालेल्या मध्यवर्ती बँकेच्या बुलेटिनमध्ये यावर चिंता व्यक्त केली आहे.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या लेखात वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी टोमॅटोचा पुरवठा वाढण्यावर भर दिला आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती’वर प्रकाशित लेखात म्हटले की,
प्रमुख उत्पादन क्षेत्रात खराब वातावरण आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे यंदा टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे आर्थिक गणित बिघडले आहे. एकूण महागाई दरात टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे अस्थिरता येण्याची शक्यता आहे.
टोमॅटोच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून त्याचा परिणाम इतर भाज्यांच्या दरावर देखील होत आहे. एवढेच नव्हे तर जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांच्या किमतीत देखील यामुळे कमालीची वाढ होताना दिसत आहे.
देशात अलीकडच्या काळात भाज्या आणि डाळींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव २०० रुपयांच्या पुढे गेला आहे. याचा आणखी एक दुष्परिणाम होणार आहे. महागाईचा विचार करता आरबीआय सध्या रेपो दरात कपात करणार नाही,
परंतु तो वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे कर्जदारांचा ईएमआय कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता नाही. हंगामी कारणांमुळे अलीकडे देशात जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. टोमॅटोबरोबरच आले, दुधी, हिरवी मिरचीचे भावही वाढले आहेत.
महागाई नियंत्रित करण्यासाठी, आरबीआयने गेल्या वर्षी मेपासून रेपो दरात २.५ टक्के वाढ केली आहे. अन्नधान्य महागाईचा वाटा ४० टक्के आहे. हे पाहता आरबीआय सावध भूमिका घेऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.