Maharashtra News : केंद्रीय वित्त मंत्रालयाने एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी अनेक कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. एलआयसी (एजंट) नियमन, २०१७ मधील सुधारणा, ग्रॅच्युईटी मर्यादेत वाढ आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनाचा समान दर यांच्याशी संबंधित या कल्याणकारी उपाययोजना आहेत.
एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कल्याणकारी उपाययोजनांमध्ये एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युईटीची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे एलआयसी एजंट्सच्या कामकाजाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल आणि त्यांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर पुनर्नियुक्त केलेल्या एजंटना पुनर्नूतनीय कमिशनसाठी पात्र होण्यासाठी सक्षम करून त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य पुरवण्यात येणार आहे.
सध्या एलआयसी एजंट जुन्या एजन्सी अंतर्गत पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यवसायावर पुनर्नूतनीय कमिशनसाठी पात्र ठरत नाहीत. एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स / मुदत विमा कवच सध्याच्या श्रेणीवरून वाढवण्यात आले आहे. ते ३,००० रुपयांवरून १०,००० रुपये तर २५,००० रुपयांवरून १,५०,००० रुपये करण्यात आले आहे.
यामुळे निधन झालेल्या एजंटच्या कुटुंबीयांना महत्त्वपूर्ण उपयोग होईल आणि त्यांना अधिक भरीव कल्याणकारी लाभ मिळणार आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी३० टक्के या समान दराने कौटुंबिक निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.
एलआयसीच्या विकासात आणि देशात विमा विस्तार अधिकाधिक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या १३ लाखांहून अधिक एजंटना आणि १ लाखांहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना या कल्याणकारी उपाययोजनांचा लाभ होणार आहे.