Maharashtra News : राज्यात महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे सत्तेत असताना सत्तेचा पुरेपूर वापर विकासकामांसाठी केला. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविता आला, याचे आत्मिक समाधान आहे.
यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य असेल. सध्या राज्याच्या सत्तेत नसलो, तरी आमदार म्हणून जितके काम करता येईल तितके करू, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-10-03T102156.481.jpg)
राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची विविध विकासकामे मार्गी लागल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार तनपुरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक के. एम. पानसरे होते. आमदार तनपुरे म्हणाले, की महाविकास आघाडीच्या काळात माझ्याकडे सहा खात्यांची जबाबदारी होती. त्या सर्व खात्यांमार्फत मतदारसंघासह राज्यात काम करण्याची संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली होती.
त्या संधीचे सोने करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आदिवासी मंत्री असताना कात्रड येथे आदिवासी कुटुंबांना जातीचे प्रमाणपत्र शबरी योजनेतून घरकूल व विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. ऊर्जा खात्याच्या मार्फत मोठा निर्णय घेऊन वांबोरी सबस्टेशन मधून कात्रडसाठी स्वतंत्र लिंक लाईन उभी केली.
त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायमच्या दूर झाल्या. रस्ते कामास प्राधान्य दिले. सरकार बदलल्याने विविध कामांना स्थगिती मिळाली. या विरोधात पदरमोड करून न्यायालयात दाद मागितली व न्याय मिळवून घेतला. विविध कामे मार्गी लावल्याचे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सरपंच बाबासाहेब शिंदे, उपसरपंच ऋषिकेश घुगरकर, तबाजी सत्रे, संदीप निकम, भाऊसाहेब चौधरी, साहेबराव दांगट, कारभारी पागिरे, भाऊसाहेब घुगरकर, रावसाहेब निकम, नामदेव घाडगे, रावसाहेब घुगरकर, सुंदरबापू गांधले, कारभारी घुगरकर,
रमेश पागिरे, आसाराम ससाणे, कुक्कडवेढेचे सरपंच दीपक मकासरे, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, बाबासाहेब सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील सभा मंडपासाठी राहुल एकनाथ चौधरी यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचा आमदार तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.