Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण गरम झाले आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळाले नाही तर मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. हे आंदोलन सरकारला झेपणार नाही
असा इशाराही मराठा नेत्यांनी दिला होता. परंतु आता २४ तारीख तोंडावर आली असून अद्याप काहीच हालचाली शासनाकडून दिसत नाहीत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-12-22T110053.503.jpg)
त्यामुळे आता मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकणार अशा चर्चा सोशल मीडियात सुरु झाल्या आहेत. मुंबईचे रस्ते जाम करण्याची तयारी आंदोलकांकडून केली जात असल्याचेही मॅसेज फिरू लागले आहेत.
दरम्यान आता या आंदोलनाची धास्ती सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात पोलिसांनी ट्रॅक्टर मालक असलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
यात त्यांनी २४ डिसेंबर रोजी शेतीच्या कामाशिवाय इतर कुणालाही ट्रॅक्टर न देण्यासाठी किंवा स्वतःही ते घेऊन मुंबईकडे जाऊ नये असा इशाराच दिलाय. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
काय बजावली आहे नोटीस !
मराठा आरक्षणासंदर्भात २४ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणावर राज्यातील कार्यकर्ते ट्रॅक्टरसह जमा होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. या गर्दीने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो.
जाळपोळ, तोडफोडही होऊ शकते. त्यामुळे तुमचे ट्रॅक्टर मराठा समाजाचे नेते, कार्यकर्त्यांना देऊ नये किंवा आपण स्वतः ही ते सोबत घेऊन जाऊ नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त केले जाईल असे या नोटीस मध्ये म्हटले आहे.
‘त्या’ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अद्याप ट्रॅक्टर मोर्चाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना नोटिसा का देत आहेत.
सरकारने सांगितले का? नसेल तर आधी अशा नोटिसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित करावे अशी मागणी त्यांनी काल पत्रकार परिषदेत केली.