पावसाळ्यात विजेच्या दुर्घटनापासून सावधान ! काय काळजी घ्याल ? वाचा सविस्तर माहिती

Ahilyanagarlive24 office
Published:

Marathi News : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कोपरगाव तालुक्‍यातील सुरेगाव-कोळपेवाडी सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता किशोर घुमरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्लर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स तसेच घरात असलेली ओलसरे विद्युत उपकरणे,

शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शकयता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्‍य आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा, यामुळे झाडाच्या फांद्या तुटून बीज तारांवर पडतात.

तसेच झाडे पडल्याने विजेचा खांब वाकला जातो.परिणामी, बीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्‍यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्यातारापासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

ग्रामीण भागात विजेची कोणतीही दुर्घटना घडल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवरून तसेच लॅन्डलाईन क्रमांकावरून बीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

अतिवृष्टी किंवा वादळामुळे बीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्‍यता असते. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे.

पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. नागरिकांच्या हितासाठीच वीज पुरवठा खंडीत होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन घुमरे यांनी केले आहे.

पावसाळ्यात अशी घ्या दक्षता

प्रत्येक घरातील उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवा. विजेच्या उपकरणाचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खबरदारी घ्यावी. घरात शॉर्टसरकीट झाल्यास मेन स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा.

ओल्या कापड्यांवर विजेची इस्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. दुचाकी टेकवून ठेवू नये . विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळू घालू नये, असे आवाहन कनिष्ठ अभियंता किशोर घुमरे, विद्युत सहाय्यक प्रविण सानप, प्रशिक्षणार्थी चेतन भोंगळ, अनिरुद्ध पगारे, काजल तर्जूल यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe