अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसंबंधी आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आलेले अपयश लपविण्यासाठी भाजपकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जात आहे,
असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंबंधी पटोले यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.
या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे.
घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा.
राज्यात धर्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा.
राज ठाकरे यांना पुढे करून भाजपा केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे