हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण! आता डझनभर आंबे मिळणार फक्त इतक्या रुपयांत!

Published on -

पुणे- गुढीपाडव्याच्या सणानंतर पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये हापूस आंब्याच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत कोकणातून आंब्याच्या पेट्या मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सणापूर्वी महाग असलेल्या हापूस आंब्याचे दर आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसांतच हापूस आंब्याच्या आवकेत तब्बल तीन हजार पेट्यांनी वाढ झाली असून, सध्या बाजारात रोज चार ते पाच हजार पेट्यांची विक्री होत आहे. मात्र, मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नसल्याने हापूसच्या दरात डझन मागे 200 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे.

यामुळे, गुढीपाडव्यापूर्वी 1000 ते 1800 रुपये डझन मिळणारा हापूस आंबा आता 800 ते 1200 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे.

गुलटेकडी फळबाजारात कोकणातील विविध भागांतून दररोज चार ते आठ डझनाच्या चार ते पाच हजार पेट्यांची आवक होत आहे. गुढीपाडव्याआधी ही आवक अवघी एक ते दोन हजार पेट्यांपर्यंत मर्यादित होती. मात्र, सणानंतर उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे दाखल झाले आणि त्याचा परिणाम थेट दरावर झाला.

कच्च्या हापूस आंब्याच्या पेट्यांच्या घाऊक किमतीत 1000 ते 2000 रुपयांची घट झाली आहे, त्यामुळे किरकोळ बाजारातही दर स्वस्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. सध्या तरी आंब्याला मोठा धोका नसला तरी, वादळी पाऊस झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरील आंब्यांची गळ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उत्पादन घटल्यास बाजारात आंब्याची आवक कमी होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा दरवाढीच्या स्वरूपात दिसू शकतो.

हापूस आंब्याच्या दरावरील पुढील काही आठवड्यांतील स्थिती हवामानावर अवलंबून असेल, असे मत मार्केट यार्डातील आंबा व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केले आहे. सध्या दर घसरले असले तरी, हवामान अनुकूल राहिले आणि उत्पादन वाढले तर अजून काही काळ ग्राहकांना स्वस्त दरात हापूस आंबा मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe